अर्धवट काम करण्याचा बेजबाबदारपणा कंत्राटदाराला भोवला; जागरूक नागरिकाची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 10:00 PM2023-03-23T22:00:56+5:302023-03-23T22:01:50+5:30
Nagpur News रस्ताचे काम झाल्यानंतर अनेकदा कंत्राटदाराकडून रेती-गिट्टी व इतर मलबा उचलण्यात येत नाही व त्यातून अपघात घडतात. मात्र नागपुरातील एका जागरूक नागरिकाने भावाच्या अपघातानंतर कंत्राटदाराविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली.
नागपूर : रस्ताचे काम झाल्यानंतर अनेकदा कंत्राटदाराकडून रेती-गिट्टी व इतर मलबा उचलण्यात येत नाही व त्यातून अपघात घडतात. बहुतांश नागरिकांकडून असेच चालत आहे असे म्हणत अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करण्यात येते. मात्र नागपुरातील एका जागरूक नागरिकाने भावाच्या अपघातानंतर कंत्राटदाराविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीदेखील प्राथमिक चौकशी करत राजश्री कंस्ट्रक्शन कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुधीर हाडगे (३८, श्रीकृष्णनगर) असे संबंधित जागरूक नागरिकाचे नाव आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांचे मोठे बंधू सुशील हाडगे (४२, श्रावणनगर) यांचा अपघात झाला. रात्री कार्यालयातून घराकडे परतत असताना राजेंद्रनगर चौकात रस्त्यावर असलेल्या रेती-गिट्टीवरून त्यांची दुचाकी घसरली व त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना जवळपास तीन आठवडे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. सुधीर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे रस्त्याचे बांधकाम सुरू होते व कंत्राटदाराने तेथील रेती-गिट्टी उचलत रस्ता साफ करण्याची तसदी दाखवली नव्हती. शिवाय सुरक्षेचे तसेच धोक्याची सूचना देणारे फलकदेखील नव्हते. कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात झाल्याची तक्रार त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी राजश्री कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
नागरिकांनी जाब विचारण्याची गरज
शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. बरीच कामे अर्धवट असून काही ठिकाणी अशाच पद्धतीने सामान व मलबा पडून आहे. नागरिकांनी यासंदर्भात मनपाच्या झोन कार्यालयांत तक्रारी करत कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.