बुद्धिस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार; जैन सेतवाळ समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 08:38 PM2023-04-15T20:38:55+5:302023-04-15T20:39:23+5:30
Nagpur News जैन समाजाची जेवढी दैवत आहे, त्या स्थळांना जोडणारा जैन सर्किट मार्ग तयार करण्याची माझी योजना असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नागपूर : भगवान बुद्धांचा जिथे जन्म झाला आणि त्यांचे देहावसन जिथे झाले, त्या सर्व स्थळांना जोडणारा २२ हजार कोटींचा बुद्ध सर्किट मार्ग तयार केला आहे. बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांना जोडणारा १२ हजार कोटींचा मार्ग तयार झाला आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेले संत ज्ञानेश्वर, तुकारामांच्या देहू आणि आळंदीवरून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जाता यावे, यासाठी १२ हजार कोटींचा भक्तिमार्ग पूर्णत्वास येत आहे. याच धर्तीवर जैन समाजाची जेवढी दैवत आहे, त्या स्थळांना जोडणारा जैन सर्किट मार्ग तयार करण्याची माझी योजना असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेतर्फे जैन सैतवाळ समाजाचे दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला अतिविशेष अतिथी म्हणून गडकरी यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अधिवेशनाचे उद्घाटन अजित जैन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिलीप घेवारे उपस्थित होते.
ध्वजारोहण गुलाबराव फुरसुले यांच्या हस्ते झाले. मुख्य अतिथी म्हणून सुभाष कुकेकर, अनंतराव चाणेकर, सन्मती कुरकुटे, विवेक भागवतकर, आनंदराव सवाने, दिलीप शिवणकर, रमेश रणदिवे, चंद्रकांत वेखंडे, मुकुंद वालचाळे, विजयकुमार लुंगाडे, नारायण पळसापुरे, सुनील सिंगतकर, सुरेश कहाते, प्रमोद जैन, दिलीप चौधरी, जगदीश गिल्लरकर, सुनील फरसुले आदी उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी धर्मध्वज महायात्रा काढण्यात आली. अधिवेशनाला देशभरातून व विदेशातूनही सैतवाळ समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोज बंड व वैशाली नखाते यांनी केले. दोन दिवसीय अधिवेशनात समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी विविध चर्चासत्र, कला-उत्सव संपन्न होणार आहे. अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.