‘तथागत’ महानाट्याद्वारे उलगडला भगवान गौतम बुद्धांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 10:18 PM2022-12-06T22:18:38+5:302022-12-06T22:19:57+5:30

Nagpur News ‘तथागत’ या महानाट्याद्वारे खासदार सांस्कृतिक महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.

The journey of Lord Gautama Buddha unfolded through 'Thathagata' Mahanatyam | ‘तथागत’ महानाट्याद्वारे उलगडला भगवान गौतम बुद्धांचा प्रवास

‘तथागत’ महानाट्याद्वारे उलगडला भगवान गौतम बुद्धांचा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देखासदार सांस्कृतिक महोत्सवात महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

नागपूर : भगवान बुद्धांच्या ज्ञान व तत्वज्ञानाचा प्रचार- प्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला होता. बाबासाहेबांच्या या बुद्ध चरित्राचा नाट्यमय आविष्कार असलेल्या ‘तथागत’ या महानाट्याद्वारे भगवान गौतम बुद्धांच्या चरित्राचा प्रवास उलगडण्यात आला. खासदार सांस्कृतिक महोत्सवात या महानाट्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात मंगळवारी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘तथागत’ या महानाट्याचा शंभरावा प्रयोग सादर करण्यात आला. मंथन नागपूरनिर्मित, मोहन मदान प्रस्तुत व शैलेंद्र कृष्णा बागडे दिग्दर्शित ‘तथागत’ या महानाट्याचे लेखन किरण बागडे यांनी केले असून संगीत भूपेश सवाई यांचे आहे. कविता कृष्णमूर्ती, उदीत नारायण, ओम पुरी व विक्रम गोखले या दिग्गज कलाकारांचा पार्श्वस्वर लाभलेल्या या महानाट्यात दोनशे कलाकारांचा समावेश होता. बुद्धकालीन संगीत, रंगभूषा, वेशभूषा, घोडे, रथ महानाट्याचे वैशिष्ट्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथनातून भगवान बुद्धांची कथा उलगडण्यात आली. भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध टप्पे या नाटकात दर्शविण्यात आले. प्रभावी आणि वेगवान मांडणी, कलावंतांचा अभियन आणि त्याला लाभलेली गीत, संगीताची साथ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली. यावेळी ॲड. सुलेखा कुंभारे, भन्ते धम्मोदय महाथेरो, माजी आ. नाना शामकुळे, भूपेश थुलकर, सुरमणी पं. प्रभाकर धाकडे, अनंतराव घारड, व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, माजी आ. मिलिंद माने, ॲड. धर्मपाल मेश्राम, अरविंद गजभिये, संदीप जाधव, राजेश हातीवेळ, सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते. तत्पूर्वी यावेळी रामदेव वटकर व शैलेंद्र कृष्णा यांच्या ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाचे पोस्टर व टिझरचे विमोचन करण्यात आले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.

धाकडे गुरुजींच्या व्हायोलिन वादनाने रिझवले

- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजींच्या सूरमयी व्हायोलिन वादनाची मेजवानी खासदार सांस्कृतिक महोत्सवात नागपूरकरांना मिळाली. त्यांनी राग यमनने वादनाला सुरुवात केली. भारतीय घटनेसंबंधित ‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे’ हे गीत पं. धाकडे गुरुजींनी व्हायोलिनच्या सुरावटीने सजवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वरसुमनांजली वाहिली. त्यांना तबल्यावर राम खडसे यांनी तर तानपुऱ्यावर लक्षती काजळकर यांनी साथसंगत केली. तत्पूर्वी मंगळवारी महोत्सवाची सुरुवात श्याम देशपांडे यांच्या चमूने सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने झाली. या कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले.

...............

Web Title: The journey of Lord Gautama Buddha unfolded through 'Thathagata' Mahanatyam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.