अपघात रोखणारी 'कवच' सिस्टम थंड बस्त्यात : हजारो कोटींची विकास कामे मात्र जोरात

By नरेश डोंगरे | Published: June 17, 2024 10:44 PM2024-06-17T22:44:05+5:302024-06-17T22:44:24+5:30

प्रगतीचे चित्र रेखाटणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून निरपराध प्रवाशांचे जीव दुर्लक्षित

The 'Kavach' system that prevents accidents is in the cold: Development works worth thousands of crores are in full swing indian railway accident | अपघात रोखणारी 'कवच' सिस्टम थंड बस्त्यात : हजारो कोटींची विकास कामे मात्र जोरात

अपघात रोखणारी 'कवच' सिस्टम थंड बस्त्यात : हजारो कोटींची विकास कामे मात्र जोरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वे नेटवर्कच्या विकासाचा सध्या सर्वत्र धडाका सुरू आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतुद केंद्र सरकारने केली आहे. मात्र, विकासाच्या या वेगात अत्यंत आवश्यक ठरणारी 'सुरक्षा कवच सिस्टम' थंड बस्त्यात टाकून निरपराध रेल्वे प्रवाशांचे लाखमोलाचे जीव दुर्लक्षित केले आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा संबंधित वर्तुळात चर्चेला आला आहे.

गेल्या वर्षी बालासोर, ओडिशात भीषण रेल्वे अपघात झाल्यानंतर असे अपघात रोखण्यासाठी अत्यंत परिणामकारक असलेली 'कवच सिस्टम' जागोजागी तसेच तातडीने कार्यान्वित करण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, भारतीय रेल्वे नेटवर्कचा कायापालट करणारी अमृत भारत योजना हाती घेण्यात आली. या योजनेसाठी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालयाने हजारो कोटींची तरतुद करून देशातील १२७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे विविध मार्गावर अॅटोमेटिक सिग्नलिंग, रेल्वे ट्रॅक प्रशस्त होऊन रेल्वे गाड्याच नव्हे तर स्थानकंही चकाचक होऊ लागले. प्रवाशांना अधिकाधिक सोयी-सुविधा देण्याचे कामही धडाक्यात सुरू झाले. मात्र, हे करतानाच 'सुरक्षा कवच' कार्यान्वित करण्याचे काम मंदावले.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी, २ जून २०२३ला बालासोर, ओडिशात भीषण रेल्वे अपघात होऊन २७८ जणांचा मृत्यू झाला, अनेक जण बेपत्ता झाले अन् पाचशेंवर प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर देशभरातील सर्वच रेल्वेगाड्या आणि ट्रॅकवर 'कवच' सिस्टम लावण्यात येणार असल्याची घोषणा झाली. मात्र, ती पोकळ ठरली. वर्षभरात मोजके रुट आणि गाड्या सोडल्या तर रेल्वे प्रशासनाने भारतीय रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचे कवच घालण्यावर भर दिला नाही. त्यामुळे सोमवारी प. बंगालमध्ये रेल्वेचा अपघात होऊन निरपराध प्रवाशांना नाहक जीव गमवावे लागले.

-------------
काय आहे कवच तंत्रज्ञान

दोन गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असेल अन् त्या एकमेकांना धडक देणार असतील तर 'कवच' सिस्टममुळे तसे होत नाही.
रेल्वे रुळांवर कवच कार्यान्वित केले असेल तर अतिउच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे ५ किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या रुटवर धावणाऱ्या गाड्यांचे संरक्षण होते. चुकून कोणती ट्रेन रेड सिग्नल असतानाही धावत असेल तर त्या आणि त्या रुटवर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या लोको पायलटला, आजुबाजुच्या स्टेशन मास्टरला धोक्याची सूचना मिळते. एवढेच नव्हे तर पाच किलोमिटर परिसरातील सर्वच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन काही वेळेसाठी आपोआप बंद पडते, असे हे बहुगूणी 'कवच' आहे.

--------------
ट्रायल यशस्वी झाली मात्र...

भारतीय रेल्वेचे वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे जाणारे शेकडो निरपराध लोकांचे जीव वाचविण्यासाठी २०१२ ला टीसीएएस नावाने अपघात रोखण्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय संशोधकांनी २०१६ ला 'कवच' ही प्रणाली प्रत्यक्षात आणली. २०२२ मध्ये रेल्वे मंत्रालयाने कवच सिस्टमची यशस्वी ट्रायल घेतली. जाणीवपूर्वक दोन ट्रेन एकाच रुळावर परस्परविरोधी दाैडविण्यात आल्या. मात्र, 'कवच'मुळे रेल्वेच्या ट्रॅकवर दोन्ही गाड्यांचे इंजिन अॅटोमेटिक बंद पडून पाच किलोमिटर अंतरावर या गाड्या आोपाआपच थांबल्या. तत्पूर्वी दोन्ही गाड्यांच्या लोको पायलटला धोक्याची सूचनाही मिळाली होती.

---------------
चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेच नाही 'कवच'

महाराष्ट्रात मुंबईपासून तो चंद्रपूरपर्यंतचा तसेच मध्य प्रदेशातील बैतूल, पांढूर्णा, ईटारसीपर्यंतचा शेकडो किलोमिटरचा ट्रॅक मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येतो. त्याच प्रमाणे नागपूर (ईतवारी) पासून तो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील १२०० किलोमिटरचा परिसर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येतो. रेल्वेच्या या दोन्ही विभागात रोज शेकडो रेल्वे गाड्या धावतात. मात्र, यातील कोणत्याही गाडीला किंवा ट्रॅकवर 'कवच सिस्टम' बसविण्यात आलेली नाही. हे संपूर्ण काम केंद्राच्या अख्त्यारित येत असल्याने येथील अधिकारी या विषयावर काही बोलत नाहीत. ते याबाबतची खंतही खासगीतच व्यक्त करतात.
 

Web Title: The 'Kavach' system that prevents accidents is in the cold: Development works worth thousands of crores are in full swing indian railway accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.