राजा चुकतोय व ते सांगणे आमचे कामच; उद्धव ठाकरेंकडूनदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 09:14 PM2022-12-20T21:14:16+5:302022-12-20T21:15:06+5:30
Nagpur News ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नागपूर : विधीमंडळात नागपुरातील नासुप्रच्या भूखंडाचे प्रकरण पेटल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मैदानात उतरले आहेत. राजा चुकला तर त्याचे फटके जनतेला बसतात. ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नासुप्रच्या भूखंडाबाबत नागपूर खंडपीठाने दिलेला स्थगिती आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष कोर्टात का होता व त्याला स्थगिती का देण्यात आली आहे, याचे त्यांनी उत्तर द्यावे. स्थगिती देताना प्रकरणी न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं सांगितलं आहे. ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोप झाल्यावर याआधीही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यंत्रणेवर अवाजवी दबाव असता कामा नये. जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर त्या व्यक्तीने पदावर राहणं योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी हा मुद्दा सभागृहात लावून धरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
आमदारांच्या निधीला कात्री लावण्यात आली व तो विषयदेखील महत्त्वाचा आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी आमदारांच्या निधीतील विषमता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
ग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणा
ग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वातावरण वेगळे असते. तेथे पक्षापेक्षा स्थानिक बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तेथील यश-अपयश पक्षाचे नसते. त्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य सरकार घाबरट
सीमाप्रश्नावरदेखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सीमाप्रश्नाच्या आंदोलनात अगोदर लाठ्याकाठ्या खाल्ल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. मग आता ते गप्प का आहेत. मराठी माणूस कर्नाटकच्या सरकारचा मार खातो आहे. आता सरकार ठोस भूमिका घेणार नाही का, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकार घाबरट असून कर्नाटकच्या नेत्यांनी डोळे दाखविले तर माघार घेतली, अशी टीकादेखील त्यांनी केली.
राज्यपालांनी स्वत:हून रामराम ठोकावा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या नेतृत्वाला मी काय करू, असे विचारत आहेत. महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला असून, त्यांच्याबाबत राज्यात असंतोष आहे. त्यांच्यात लाज शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून रामराम ठोकावा, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.
मोर्चा ‘फडणवीस साईज’चा
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटले होते. त्याबाबत विचारणा केली असता तो मोर्चा ‘फडणवीस साईज’चा असल्याचे ठाकरे म्हणाले.