शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस; ३० जानेवारीला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 10:44 AM2023-01-28T10:44:23+5:302023-01-28T10:46:24+5:30
एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ हा आकडा एकदाच लिहा
नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरीदेखील १ हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील. उदाहरणार्थ, पाच उमेदवार निवडणुकीत उभे असतील आणि त्यापैकी एक उमेदवार निवडून द्यायचा असेल तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर १ ते ५ असे आकडे घालता येतील.
येत्या ३० जानेवारीला मतदान होत असून शनिवार, २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रचार संपणार आहे. नागपूर विभागातील ५ जिल्ह्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया व भंडारामध्ये ४८ तास अधी प्रचार संपणार आहे. या पाच जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दुपारी वाजता प्रचार संपणार आहे.
शिक्षक मतदारसंघात उमेदवारांपेक्षा नेत्यांमध्येच जोरदार ‘टसल’
असे करा मतदान
- उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या “पसंतीक्रम” दर्शवाचा स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार १, २, ३, ४, ५ इत्यादी आकडे घालून दर्शवा.
- निवडणूक अधिकाऱ्याने पुरविलेले कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रूपामध्ये चिन्हांकित करता येतील.
- जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. मतपत्रिकेबरोबर हा स्केच पेन तुम्हाला देण्यात येईल. अन्य कोणताही पेन वापरू नका.
- मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द पेन्सिल, बॉलपॉइंट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरू नका कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.
- उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहून मतदान करा. १ हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहा.
- मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द लिहू नका किंवा तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे लिहू नका. तसेच तुमच्या अंगठ्याचा ठसादेखील उमटवू नका.
...तर मतपत्रिका ठरेल अवैध
- १ हा आकडा घातलेला नसेल.
- १ हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल.
- १ हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे याबाबत संदेह निर्माण होईल अशा प्रकारे घातलेला असेल.
- एकाच उमेदवारांच्या नावासमोर १ आणि त्याबरोबर २, ३ इत्यादी आकडेदेखील घातलेले असतील.
- पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शविलेला असेल.
- मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असेल.
- निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनव्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल.
मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
- मतदार असलेल्या शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा देण्यात येणार आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.
- कोरोनाग्रस्त असणाऱ्यांनी दुपारी ३ नंतर मतदान करा
मतदानादरम्यान निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निर्देशाप्रमाणे कोविड- १९ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावयाचे आहे. मतदानाचे दिवशी शिक्षक मतदारांनी मास्क घालून येणे आवश्यक आहे. रांगेत उभे असताना ६ फुटांचे अंतर राखणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची सोय केलेली असून त्याचा वापर करण्यात यावा. ताप असल्यास, जाणवत असल्यास, कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्यास अशा मतदारांनी मतदानाकरिता शेवटच्या तासाला म्हणजे ३ ते ४ या वेळेतच मतदान करावे.