तिकीट काढण्यास उशीर केला म्हणून बस कंडक्टरकडून वकिलाला मारहाण, रस्त्यातच उतरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 10:51 PM2022-11-04T22:51:07+5:302022-11-04T22:52:08+5:30
तिकीट काढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून राज्य महामंडळाच्या बसमधील कंडक्टरने नागपुरातील एका वकिलाला मारहाण करत त्याला रस्त्यातच बसमधून उतरविल्याचा प्रकार घडला.
नागपूर : तिकीट काढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून राज्य महामंडळाच्या बसमधील कंडक्टरने नागपुरातील एका वकिलाला मारहाण करत त्याला रस्त्यातच बसमधून उतरविल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ॲड.गोपाल भजभुजे (संजय नगर, अंबाझरी) हे जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात. २ नोव्हेंबर रोजी ते कामानिमित्त वर्ध्याला गेले होते. परत येत असताना ते एमएच ४१- बीटी - २८२४ या बसमध्ये बसले. परत येताना झोप आल्याने ते सीटवर झोपले. बुटीबोरीच्या समोर त्यांना जाग आली असता त्यांनी तिकीट काढण्यासाठी सहप्रवाशाला कंडक्टरबाबत विचारणा केली. अडीच वाजता त्यांनी कंडक्टरला तिकिटाचे पैसे दिले असता कंडक्टरने त्यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. अनेक वकील मी पाहिले आहे अशी भाषा वापरत त्याने भजभुजे यांचा अपमानदेखील केला. तिकिटाचे पैसेदेखील त्यांच्या अंगावर फेकून दिले.
इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली असता कंडक्टरने भजभुजे यांच्याकडून ५०० रुपयांची नोट घेतली. मात्र उरलेले पैसे व तिकीटच दिले नाही. मला तुम्ही कुठलेही पैसे दिले नाही असा कांगावा त्याने सुरू केला. त्यानंतर त्याने धमकीदेखील दिली. चिंचभुवन चौकात बस थांबवून त्याने चालक व एका व्यक्तीसह भजभुजे यांना मारहाण केली व गाडीच्या खाली उतरविले. भजभुजे यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बसच्या कंडक्टर, चालकासह अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.