‘सेल्फोस’ विष घेतल्याने मृत्यूचा दाढेत अडकलेल्या तरुणाचा वाचला जीव
By सुमेध वाघमार | Published: May 16, 2024 08:17 PM2024-05-16T20:17:19+5:302024-05-16T20:17:46+5:30
-मध्य भारतातील पहिलेच प्रकरण : अॅल्युमिनियम फॉस्फाईड विषामुळे ९५ टक्के मृत्यूचा धोका.
नागपूर : किडे लागू नये म्हणून तांदळात ठेवले जाणारे ‘सेल्फोस’ म्हणजे ‘अॅल्युमिनियम फॉस्फाईड’ खाल्याने ३६ वर्षीय तरुण मृत्यूच्या दाढेत अडकला होता. या विषावर उपचार नाही. ९५ टक्के मृत्यूचा धोका होता. परंतु क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांडक यांनी आपल्या अनुभव व कौशल्याचा बळावर नवीन उपचार पद्धतीने रुग्णाचे प्राण वाचविले. या विषातून बरा झालेला मध्यभारतातील हे पहिले प्रकरण असावे, असेही त्यांचे म्हणणे होते.
छिंदवाडा येथील ३६ वर्षीय तरुण प्रमोद हिवाडे याने चुकून ‘सेल्फोस’ या जहाल विषाचा दोन पुड्याचे सेवन केले. त्याचा कुटुंबियाने तातडीने त्याला नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. चांडक यांनी प्रमोदला तापासले असता त्याची प्रकृती गंभीर झाली होती. ईसीजीच्या अहवालावरून त्याचे हृदय कधीही बंद पडण्याची शक्यता होती. पुढील ७२ तासांत मृत्यूचा धोका होता. या विषावर उपचार नसल्याने शरीरातून विष काढून जीव वाचविण्याचा एकच पर्याय होता. त्यासाठी त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून परवानगी घेतली. त्यानंतर पुढील १६ तास शर्थीच्या उपचार करून रुग्णाचा जीवाचा धोका टाळला.
-हृद्य, फु फ्फुस, किडनीला होता धोका
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. चांडक म्हणाले, ‘सेल्फोस’ या गोळ्याचा वापर तांदळात किडे लागू नये म्हणून घराघरात होतो. प्रमोदने या विषाचे २० ग्रॅमचा दोन पुड्याचे सेवन केले होते. या गोळ्या ओलाव्याचा संपर्कात येताच गॅस निर्माण होतो. गॅसमुळे रक्तातील पेशीमधील आॅक्सीजन बाधित होतो. परिणामी, हृद्य, फुफ्फुस, किडनीसह इतरही अवयवाचे काम करणे हळूहळू बंद होते. मात्र रुग्ण उपचाराचा ‘गोल्डन अव्हर’ म्हणजे ६ तासात आला होता. यामुळे पर्यायी उपचाराचा निर्णय घेतला.
-रक्त फिल्टर केले, नवीन रक्त चढवले
डॉ. चांडक म्हणाले, रुग्णाचा शरीरातू विष बाहेर काढण्यासाठी रक्त फिल्टर करणे म्हणजे ‘हिमोडायलिसीस’ देणे, नवीन रक्त चढविणे आणि शौचातून विष बाहेर काढणे ही उपचार पद्धती वापरली. सलग १६ तास ही उपचार पद्धती दिली. या दरम्यान त्याचा रक्तदाब कमी किंवा जास्त होऊ नये म्हणून डॉक्टरांची एक चमू लक्ष ठेवून होती. या शर्थीच्या उपचाराने हळूहळू रुग्ण बरा होऊ लागला. आठ दिवसानंतर त्याला आज गुरुवारी सुटी देण्यात आली.
-या डॉक्टरांच्या चमूचा प्रयत्नाला आले यश
डॉ. राजेंद्र चांडक यांच्यासह डॉ. एस. डी. सूर्यवंशी, डॉ. किरण पटेल, डॉ. आर. गणेश, डॉ. संजय मानकर, डॉ. गौरव बनसोड, डॉ. सुनील बंगाल व ललीत खोब्रागडे या डॉक्टरांच्या चमूचा प्रयत्नाला यश आले.