पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले अपहरण झालेल्या तरुणाचे प्राण
By योगेश पांडे | Published: April 18, 2024 11:06 PM2024-04-18T23:06:30+5:302024-04-18T23:06:40+5:30
मुळचा जौनपूर येथील रहिवासी असलेला तरुण एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे. या घटनेचा सूत्रधार मुकेश भारती अनेक दिवसांपासून तरुणाच्या बहिणीचा छळ करत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खुनाच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचा पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचला. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत हिंगणा येथील बालाजी नगर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. आरोपी मुकेश गौतम भारती (मछलीशहर, उत्तरप्रदेश) व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुळचा जौनपूर येथील रहिवासी असलेला तरुण एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे. या घटनेचा सूत्रधार मुकेश भारती अनेक दिवसांपासून तरुणाच्या बहिणीचा छळ करत होता. उपाध्यायच्या वडिलांनी भारतीविरोधात जौनपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी भारतीला मारहाणदेखील केली. यानंतर भारती तरुणाच्या कुटुंबियांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्या साथीदारांसह तरुणाचे त्याच्या घरासमोरून सायंकाळी ७.४५ वाजता अपहरण केले. आरोपींनी त्याला जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवले आणि आपल्यासोबत नेले. परिसरातील एका नागरिकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. जौनपूरमध्ये दाखल केलेली तक्रार आणि भारतीशी असलेल्या शत्रुत्वाची त्यांनी माहिती दिली. तरुणाचे हत्येच्या उद्देशाने अपहरण झाल्याचा धोका पोलिसांना दिसू लागला. त्यांनी तत्काळ मछलीशहर पोलिसांना माहिती दिली. मछलीशहर पोलीस भारतीच्या घरी पोहोचताच त्याला याची माहिती मिळाली.
भारतीने तरुणाला त्याच्या बायकोला फोन लावून बोलण्यास सांगितले व मित्रांसोबत बाहेर जात असल्याची माहिती देण्यास बजावले. त्याच्या घरमालकानेदेखील पोलिसांसमोर तरुणाशी बोलणे केले. त्याने त्यांनादेखील आपण सुखरूप असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक काळे यांनी तरुणाला काही अडचणीत असेल तर फोन कट कर असे म्हटले. त्यानंतर तरुणाने फोन कट केला व तो अडचणीत असल्याचे स्पष्ट झाले.
तो मध्यप्रदेशमधील धुमा येथे असल्याचे पोलिसांना लोकेशनवरून समजले. त्यांनी तेथील पोलिसांना माहिती दिली. तेथील पोलिसांनी नाकाबंदी लावली. लखनादौनजवळ भारती आणि त्याचे साथीदार थांबले, तेथे तरुण संधी पाहून कारमधून उतरला व त्याने पळ काढला. त्याचा आवाज ऐकून लोक मदतीसाठी धावले. हे पाहून आरोपी तेथून पळून गेले. एमआयडीसी पोलिसांचे पथक लखनादौन येथे पाठवून तरुणाला नागपुरात आणण्यात आले. पोलीस भारती आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. आरोपींनी तरुणाचा खून करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.