घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 07:30 AM2022-03-31T07:30:00+5:302022-03-31T07:30:06+5:30

Chandrapur News वाॅशरीज व रेल्वे सायडिंगमधून निघणारा काळा धूर लाेकांच्या घरावर, वाहनांवर, झाडांवर, पाण्यावर जमा हाेताे. संपूर्ण परिसरावर धुराची काळी छटा पसरली असून लाेकांचे आयुष्य दयनीय बनले आहे.

The life of the locals became miserable due to the Ghughhus coal mines | घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय

घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय

googlenewsNext

आशिष राॅय

नागपूर : घुग्घुसमधील रहिवाशांचा जीव धाेक्यात घालण्यात स्पंज आयर्न प्लॅन्ट व सिमेंट कारखानेच कारणीभूत नाहीत, तर या भागात असलेल्या काेळसा खाणी, काेळसा वाहणाऱ्या रेल्वे सायडिंग आणि वाॅशरीजनेही भर घातली आहे. वाॅशरीज व रेल्वे सायडिंगमधून निघणारा काळा धूर लाेकांच्या घरावर, वाहनांवर, झाडांवर, पाण्यावर जमा हाेताे. संपूर्ण परिसरावर धुराची काळी छटा पसरली असून लाेकांचे आयुष्य दयनीय बनले आहे.

स्पंज आयर्न प्लॅन्टमधील बारीक लाेहकणांसह खाणीतील कोळशाच्या धुळीमुळे शहरातील सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर (आरएसपीएम) ची पातळी भयावह स्तरावर पाेहोचली आहे. २०१७-१८ मध्ये हे प्रमाण २९८ मायक्राेग्रॅम/घनमीटर हाेते, जे ६० म्युग्रॅम/घनमीटर मर्यादेच्या किती तरी अधिक आहे. यामुळे रहिवाशांमध्ये त्वचा, हृदय आणि फुफ्फुसांचे आजार वाढण्यास हे कारणीभूत ठरले आहे.

सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांनी सांगितले की, रेल्वे सायडिंग आणि कोल वॉशरी शहराच्या आत आहेत. सरकारने त्यांना तातडीने शहरापासून दूर हलवावे. त्यांच्यामुळे लाेकांचा जीव धोक्यात आला आहे. कंत्राटदार कोळशावर पाण्याची फवारणीही करीत नाहीत. आम आदमी पार्टीचे अमित बोरकर यांनी सांगितले की, नियमित आंदोलनांनंतर कोळशाचे ओव्हरलाेड ट्रक शहरातून जाणे बंद करण्यास भाग पाडले. मात्र स्पंज आयर्न आणि सिमेंट प्लॅन्टचे ट्रक अजूनही वस्तीतून फिरतात. शहराबाहेर रस्ता उपलब्ध असतानाही, ते त्याचा वापर करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लाेहकण व काेळसामिश्रीत काळ्या धुळीमुळे परिसरातील कृषी उत्पादनांवरही परिणाम झाला आहे. शिवराम वाकोडे या शेतकऱ्याने व्यथा मांडली. कोळशाच्या धुळीमुळे दरवेळी त्यांचे कापसाचे पीक उद्ध्वस्त होते. पानांवर धूळ जमते आणि वाढ खुंटते. उत्पादन तर कमी हाेतेच, पण कापसाला काळी छटा येत असल्याने कापूस विकणेही अवघड जात असल्याचे त्यांनी सांगितले. इतर पिकांचीही तीच स्थिती आहे.

 

Web Title: The life of the locals became miserable due to the Ghughhus coal mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.