इंजिनीअरिंग प्रवेशासाठी पहिल्या दिवशी लिंकच उघडली नाही; ३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 08:50 PM2023-06-24T20:50:56+5:302023-06-24T20:51:17+5:30
Nagpur News २४ जूनपासून ३ जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु शनिवारी पहिल्या दिवशी लिंक ओपनच झाली नाही. विद्यार्थी-पालक दिवसभर प्रयत्न करीत राहिले. मात्र लिंक काही उघडली नाही.
नागपूर : इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी सेलने शनिवारपासून नोंदणीची तारीख जाहीर केली त्यानुसार २४ जूनपासून ३ जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु शनिवारी पहिल्या दिवशी लिंक ओपनच झाली नाही. विद्यार्थी-पालक दिवसभर प्रयत्न करीत राहिले. मात्र लिंक काही उघडली नाही.
सीईटी सेलतर्फे जारी करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार रजिस्ट्रेशनसोबतच विद्यार्थी ४ जुलैपर्यंत दस्तावेजाची तपासणीसुद्धा करून घेऊ शकतात. यानंतरचे शेड्युल मात्र अजून जाहीर करण्यात आलेले नाही. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. परंतु विद्यार्थ्यांसोबच कर्मचारीसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी दिवसभर प्रयत्न करीत होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत लिंक ओपनच झाली नाही. काही सुविधा केंद्रांनी सीईटी सेलशी संपर्कसुद्धा केला, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
सोमवारपासून नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळीसुद्धा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशननंतर प्रोव्हिजनल मेरिट यादी जारी केली जाईल. त्यानंतर ऑप्शन फा्ॅर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सर्वसामान्य वर्गासाठी रजिस्ट्रेशन शुल्क ८०० रुपये तर आरक्षित वर्गासाठी ६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.