‘मॅन-दाैस’ ओसरला, आता थंडी वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 07:50 PM2022-12-14T19:50:30+5:302022-12-14T19:51:10+5:30
Nagpur News बंगालच्या उपसागरात तयार झालेले मॅन-दाैस चक्रीवादळाचे अवशेष आता अरबी समुद्रात क्षीण अवस्थेत उरलेले आहे. त्यामुळे गुरुवारपासून ढगांचे आच्छादन हटून स्वच्छ सूर्यप्रकाश पसरेल असा अंदाज आहे.
नागपूर : बंगालच्या उपसागरात तयार झालेले मॅन-दाैस चक्रीवादळाचे अवशेष आता अरबी समुद्रात क्षीण अवस्थेत उरलेले आहे. त्यामुळे गुरुवारपासून ढगांचे आच्छादन हटून स्वच्छ सूर्यप्रकाश उजाळेल आणि त्यानुसार थंडीतही वाढ हाेईल; पण कडक थंडीसाठी दाेन-तीन दिवस प्रतीक्षाच करावी लागेल.
अरबी समुद्रात क्षीण अवस्थेत उरलेले मॅन-दौस चक्रीवादळाचे अवशेष पुन्हा विकसित होऊन येमेन-ओमान किनारपट्टीकडे मार्गस्थ होईल. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असले तरी त्याचा इकडे प्रभाव राहणार नाही. दरम्यान, सध्या पाकिस्तानपर्यंत पाेहोचलेले वेस्टर्न डिस्टरबन्स ३ ते ४ दिवसांत हिमाचल, उत्तराखंड भागात प्रवेश करेल आणि महाराष्ट्रातून मॅन-दाैस चक्रीवादळामुळे निर्माण झालेला ढगाळ वातावरणाचा प्रभाव नामशेष हाेईल. त्यामुळे सध्या राज्यात ६ ते ७ अंशांने वाढलेल्या किमान तापमानात हळूहळू तेवढीच घसरण हाेऊन १९ डिसेंबरपासून थंडीत वाढ हाेण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.
रात्रीच्या तापमानात विक्रमी वाढ...
दरम्यान, सध्या रात्रीच्या तापमानात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागपुरात गुरुवारी २०.६ अंश किमान तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा तब्बल ७.८ अंशाने अधिक आहे. सर्वाधिक २२.६ अंश किमान तापमान अकाेल्यात नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा ९.३ अंशाने अधिक आहे. इतर सर्व जिल्ह्यांत रात्रीचा पारा सरासरीपेक्षा ६ ते ७ अंशाने वाढलेला आहे. दरम्यान, बुधवारी रात्री वर्ध्यात १२.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. दिवसभर आकाश ढगाळलेले हाेते; पण पावसाची नाेंद झाली नाही. याशिवाय नागपूरसह सर्व जिल्ह्यात दिवसाचे कमाल तापमान ३ ते ४ अंशाने वाढलेले आहे. पुढच्या दाेन-तीन दिवसांत कमाल व किमान तापमानात घसरण हाेऊन थंडीत वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.