व्यवस्थापकाने मालकालाच लावला चुना, २० लाखांचा बनावट कूलर्सची विक्री
By योगेश पांडे | Published: May 14, 2024 05:22 PM2024-05-14T17:22:25+5:302024-05-14T17:23:19+5:30
Nagpur : कंपनीचे नाव वापरून बनावट कूलर विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कूलर कंपनीतील व्यवस्थापकाने मालकालाच चुना लावत बनावट कूलर्स तयार केले व २० लाखांच्या मालाची विक्री केली. कंपनीचे नाव वापरून बनावट कूलर विक्रीच्या रॅकेटची माहिती कळाल्यावर जाब विचारला असता त्याने मालकालाच जीवे मारण्याची धमकी दिली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राकेश सुर्यभान अवचट (५०) यांची नवीन शुक्रवारीत राम कूलर ही कंपनी आहे. त्यांच्याकडे सुधीर देवीदास चौबे (३४, महात्मा गांधीनगर, सेमिनरी हिल्स) हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. कूलरच्या व्यवसायातील नफा पाहून त्याने राज्यबाहेरील काही कूलर विक्रेत्यांशी संपर्क साधला व बनावट कूलर बनवून ते राम कूलरच्या नावाने विकण्याचा कट रचला. १८ मे २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सुधीरने आयुब राकेष बंसल (३५, मे. रामा राॅयल बंसल ट्रेडींग कंपनी, अयोध्या नगर, कान्हा विहार, गांधीपथ, जयपूर, राजस्थान), कमल कुमार सिंघल (५९, प्रोपा. एसओपीएस, ड्रिस्ट्रीब्यूटर, कमांडर काॅलोनी, सिरसी रोड, जयपूर, राजस्थान) व शैलेश अग्रवाल (३८, सालासर बालाजी सिटींग सिस्ट्रीम लिमी., बंस दालमिल जवळ, रायपूर, छत्तीसगढ) यांच्यासोबत हातमिळावणी केली.
राम कूलरच्या गोपनीय कागदपत्रांचा वापर करत सुधीरने इतर तीन आरोपींकडून बनावट कूलर्स तयार करवून घेतले. त्या बनावट कूलर्सची राम कूलरच्या नावाने विक्री केली. सुधीरने राम कूलर्सच्या नावाने बनावट बॅंक खातेदेखील उघडले. त्याने होलसेल डिलर्सकडून आलेले धनादेश बनावट खात्यात जमा करून कंपनीची २० लाखांनी फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यावर अवचट यांनी सुधीरला जाब विचारला. यावर सुधीरने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व कामावर येणेच बंद केले. अवचट यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.