कंपनीचे १४.५० लाख रुपये घेऊन पळ काढणाऱ्या मॅनेजरला हैदराबादमधून अटक
By योगेश पांडे | Published: December 22, 2023 05:48 PM2023-12-22T17:48:31+5:302023-12-22T17:49:36+5:30
पोलिसांनी ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून त्याचा माग काढत हैदराबादमधून त्याला अटक केली. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नागपूर : एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या व्यवस्थापकानेच संस्थेची साडेचौदा लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून त्याचा माग काढत हैदराबादमधून त्याला अटक केली. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मेघा इंजिनिअरिंग ॲड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे समृद्धी महामार्गाजवळ दाताळ कॅम्प येथे कार्यालय आहे. तेथे कंडुला पिटची रेड्डी (४५, मारोतीनगर, सोमाजीगुडा, हैदराबाद) हा असोसिएट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. कंपनीची रोकड हाताळायची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याने दि. २ ते ७ डिसेंबर या कालावधीत कंपनीतील १४.५६ लाखांची रक्कम स्वत:जवळ ठेवली व पोबारा केला. तो कामावरच न आल्याने कंपनीने त्याच्या घरी चौकशी केली. तसेच त्याच्या मोबाइलवरदेखील संपर्क केला. मात्र काहीच फायदा झाला नाही. अखेर वल्लुरी श्रीकांत वल्लुरी रमणय्या यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तपास केला असता तो हैदराबाद येथे असल्याची बाब समोर आली. पोलीस पथकाने त्याला हैदराबादमध्ये जाऊन अटक केली. त्याला न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक विशाल काळे, पांडुरंग जाधव, नागेश्वर दासरवार, अनिल झाडे, संजय तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.