आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; केवळ तोतापल्ली, नीलम, दशेरी आंब्याची आवक
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 10, 2024 09:05 PM2024-07-10T21:05:10+5:302024-07-10T21:05:27+5:30
कळमना फळ बाजारात सर्वाधिक विक्रीचा आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली, तसेच कोकणातील आंब्याची आवक अत्यल्प आहे. सध्या आंध्रप्रदेशचा तोतापल्ली व नीलम आणि उत्तरप्रदेशचा दशेरी विक्रीसाठी येत आहे...
नागपूर : वैशिष्ट्यपूर्ण चवीने संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या फळांचा राजा आंब्याचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही भागात पावसाने उसंत दिल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबाकाढणी सुरू आहे. कळमना बाजारात अखेरचे दोन आठवडे आवक राहील. मुसळधार पाऊस सुरू झाल्यास ग्राहक आंब्याची खरेदी बंद करतील. परंतु, सध्या आंब्याचे भाव परवडणारे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कळमना फळ बाजारात सर्वाधिक विक्रीचा आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली, तसेच कोकणातील आंब्याची आवक अत्यल्प आहे. सध्या आंध्रप्रदेशचा तोतापल्ली व नीलम आणि उत्तरप्रदेशचा दशेरी विक्रीसाठी येत आहे. तोतापल्ली दररोज ३० ते ४० टन माल येतो. भाव दर्जानुसार ५० ते ६५ रुपये किलो आहे. नीलम आंब्याची दररोज २० टन आवक असून भाव ४० ते ५० रुपये आहेत. सध्या दशेरी आंब्याची आवक जास्त आहे. दररोज ५० ते ६० टन आंबे विक्रीसाठी येत असून प्रति किलो ४० ते ६० रुपये दर आहेत. थोडाफार येणाऱ्या हापूस आंब्याचे डझन भाव ८०० रुपये ते एक हजारादरम्यान आहेत. नागपूर जिल्ह्यातील गावरानी आंब्याची आवक सुरूच आहे. भाव सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. हंगाम संपण्याच्या मार्गावर असल्याने उत्पादक निघेल तेवढा आंबा कळमन्यात विक्रीसाठी आणत आहेत.
कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, यंदा हंगामाच्या प्रारंभीपासूनच आंब्याची आवक सुरू झाली. नागपुरात सर्वाधिक विक्रीच्या बैगनपल्ली आंब्याचे भाव कळमना घाऊक बाजारात प्रारंभी १५० रुपये किलोवर गेले होते. महिन्यानंतर आवक वाढताच भाव १०० रुपयांच्या आत आले. शिवाय हापूस आंब्याचे भाव दरवर्षीप्रमाणेच दर्जानुसार ८०० ते १२०० रुपये डझन होते. मे महिन्यात तोतापल्ली, नीलम, दशेरी, गावरानी, लंगडा आंब्याची आवक सुरू झाली. त्यातील नीलम, दशेरी आणि तोतापल्ली अजूनही विक्रीसाठी येत आहे. जूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात दशेरी आंब्याचे वाढलेले भाव आता कमी झाले आहेत. विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यास आंब्याची आवक पूर्णपणे बंद होईल.