अबब! हातमजुरी करणाऱ्या मजुराला आले १८ हजारांचे पाणी बील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 20:29 IST2022-05-23T20:29:14+5:302022-05-23T20:29:45+5:30
Nagpur News वाढत्या महागाईचे चटके सोसत असलेल्या गरिबांना महापालिकेच्या पाण्याच्या बिलानेही होरपळून टाकले आहे. भानखेड्यातील एका ग्राहकाकडे एक खोलीचे घर आहे. पण त्याला आलेले पाण्याचे बिल १८,३०३ रुपये आहे.

अबब! हातमजुरी करणाऱ्या मजुराला आले १८ हजारांचे पाणी बील
नागपूर : वाढत्या महागाईचे चटके सोसत असलेल्या गरिबांना महापालिकेच्या पाण्याच्या बिलानेही होरपळून टाकले आहे. भानखेड्यातील एका ग्राहकाकडे एक खोलीचे घर आहे. पण त्याला आलेले पाण्याचे बिल १८,३०३ रुपये आहे. कुंभारपुरा, संत्रा मार्केट येथीलही एका व्यक्तीला १७ हजाराचे पाणी बिल आले आहे. हे दोन्ही ग्राहक पाणी बिल कमी करण्यासाठी जलप्रदाय विभागाच्या चकरा मारत आहेत.
भानखेडा येथील तुळजाबाई मंदिराजवळ राहणारे कन्हैय्या गौर यांनी दोन वर्षापूर्वी नळाचे कनेक्शन घेतले. २ वर्षात त्यांना महापालिकेने बिल पाठविले नाही. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच १८,३०३ रुपये बिल पाठविले. कन्हैय्या गौर यांचे एका खोलीचे घर आहे. कॉटन मार्केटमध्ये हातमजुरी करून २०० ते ३०० रुपये कमवितात. अशात १८ हजाराचे बिल बघून ते चिंतेत पडले आहे.
पांडुरंग गौर यांनीही जलप्रदाय विभागाला तक्रार केली आहे. ते १० बाय १० च्या खोलीत राहतात. त्यांना १७,९०१ रुपये पाणी बिल आले आहे. यासंदर्भात जलप्रदाय विभागाकडे तक्रार केली असता, त्यांना सांगण्यात आले की तुमच्या नळाचे कनेक्शन लिक आहे. त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले. परंतु मार्च महिन्यांत त्यांना परत २४ हजार रुपये पाण्याचे बिल आल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहे.
पाणी बिलासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, आम्ही बिल भरण्यास तयार आहोत, पण आमचा वापर किती बिल किती याची तफावत बघावी, अशी मागणी या ग्राहकांनी जलप्रदाय विभागाकडे केली आहे.