पारा उसळला! दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा; अकाेला ४४.३, नागपूर ४२.५ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 07:46 PM2023-06-01T19:46:14+5:302023-06-01T19:46:42+5:30
Nagpur News अवकाळीच्या ढगांनी मेचा शेवटचा आठवडा दिलासादायक केला असताना जूनच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्यांनी अंगाची हाेरपळ केली.
नागपूर : आता सर्वांना मान्सूनची चाहुल लागली असताना त्यापूर्वी सूर्याने आपला ताप वाढविला. अवकाळीच्या ढगांनी मेचा शेवटचा आठवडा दिलासादायक केला असताना जूनच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्यांनी अंगाची हाेरपळ केली. दाेन दिवसात विदर्भात पाऱ्याने उसळी घेतली असून नागपूरसह सर्व शहरांचा पारा ४२ अंशाच्या पार गेला. अकाेल्यात सर्वाधिक ४४.३ अंश तापमानाची नाेंद झाली. पुढच्या दाेन दिवसात विदर्भातील काही ठिकाणी उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अवकाळी पावसामुळे मे महिन्याचा शेवटचा आठवडा दिलासादायक ठरला हाेता. जूनची सुरुवातही गारव्याने हाेईल, असा अंदाज हाेता. मात्र हा अंदाज चुकला. ढगाळ वातावरण असले तरी पारा चढायला लागला आहे. हवामान विभागाने २४ तासापूर्वी मान्सूनच्या आगमनाची सुचना दिली आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याची प्रतीक्षा आहे. मात्र आतापर्यंत ढगांमुळे शांत राहिलेला सूर्य उन्हाळ्याच्या निराेपापूर्वी उग्र रूप घेत आहे. तसेही जूनच्या २० ते २५ तारखेपर्यंत उन्हाच्या झळा विदर्भवासियांना साेसाव्याच लागतात. त्याचे संकेत सूर्याने दिले आहेत.
दाेन दिवसापासून तापमानाचा चढाव सुरू हाेता. गुरुवारी पाऱ्याने अधिक उसळी घेतली. अकाेल्यात पारा ४४.३ अंशावर गेला, जे यंदाच्या सिजनमधील सर्वाधिक तापमान ठरले. याशिवाय वर्धा ४३.९ अंश, अमरावती ४३.८ अंश, गडचिराेली ४३.४ अंश तर ब्रम्हपुरीचा पारा ४३ अंशावर पाेहचला. त्यानंतर चंद्रपूर व गाेंदिया ४२.८ अंश, वाशिम ४२.६ अंश तर नागपूर व यवतमाळमध्ये ४२.५ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. कमाल तापमान वाढले असले तरी रात्रीचा पारा मात्र सरासरीपेक्षा खाली आहे. नागपूरला २४.१ अंश किमान तापमान हाेते, जे ४.८ अंशाने कमी आहे. यासह गाेंदिया, चंद्रपूर, यवतमाळमध्येही रात्रीचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशाने कमी आहे.
वातावरणीय बदलामुळे कमाल तापमान वाढणार असून येत्या २ व ३ जून राेजी विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाटांचा सामना करावा लागण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.