'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 09:14 PM2023-02-18T21:14:27+5:302023-02-18T21:14:57+5:30
Nagpur News मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.
नागपूर : आपण स्वत: की आयुष्यभर जपलेली मूल्ये, सिद्धांत यापैकी एकाची निवड करण्याचे, भूमिका घेण्याचे क्षण मोजके असतात. अशावेळी मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात जवाहरलाल दर्डा यांची इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक आठवण सांगितली. समाजसेविका सीमा साखरे मधुमालती नावाने ‘लोकमत’मध्ये सदर लिहायच्या. इंदिरा गांधी व मनेका गांधी यांच्यातील वादावेळी त्यांनी त्या सदरात इंदिरा गांधी यांच्यावर प्रखर टीका केली. हा लेख इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचला. दर्डा यांना बोलावून विचारणा करण्यात आली. यावेळी बाबूजींनी आपण आपल्या वृत्तपत्रात पत्रकारांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्रास सहन करू, पण तडजोड नाही, अशी भूमिका बाबूजींनी घेतली. तो आठवणीचा धागा पकडून श्री. शाह म्हणाले, की इंदिरा गांधी यांच्यासमोर जवाहरलाल दर्डा यांनी जी ठोस भूमिका मांडली ती मोठी गोष्ट होती. अशा घटनाच बाबूजींसारख्या व्यक्तीला अमरत्व देतात. अशा भूमिका घेता आल्यामुळेच बाबूजींनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
ते पुढे म्हणाले, बाबूजींच्या आयुष्यातून बरेच काही शिकायला हवे. स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रिय असताना त्यांनी एक चांगले वर्तमानपत्र समाजात कसे कार्य करू शकते याचे तत्त्व व मापदंड निश्चित केले. बाबूजींनी याबाबत कुठलेही लेखी ‘चार्टर’ लिहिले नाही, तर त्यांनी त्यांच्या कृतीतून हे तत्त्व संस्थेतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविले व पत्रकारितेत आदर्श प्रस्थापित केला. स्वातंत्र्याच्या चळवळीत बाबूजींनी जवळपास पावणेदोन वर्षे कारावास भोगला. सुभाषचंद्र बोस यांच्या आझादहिंद सेनेची शाखा त्यांनी १९४४ मध्ये यवतमाळमध्ये स्थापन केली. जीवनात ठोस भूमिका घेण्याची वेळ आयुष्यात दोन-तीनवेळाच येते. मला माझा विचार करायचा की तत्त्वांवर ठाम राहायचे, यातून एकाची निवड करायची असते. तत्त्वांवर ठाम राहणारी भूमिका घेण्याचा क्षण व्यक्तीला महान बनवतो.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात व्यक्तीचा विरोध नको, हे तत्त्व बाबूजींनी पाळले. वसंतराव नाईक यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, पण दोघांची वाट वेगळी झाली तेव्हा त्यांनी अत्यंत सुशीलतेने 'ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी' अशा मथळ्याचा अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखातही बाबूजींनी वसंतराव नाईक यांची स्तुती केली होती. विचाराने वेगळे झालो आहोत, पण मनाने नाही, अशा भावना त्यातून त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आजच्या राजकारणात हे फार महत्त्वाचे आहे. आज अनेकवेळा पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात, पण राजकारणात आपला फक्त वैचारिक विरोध असतो. व्यक्तीचा विरोध नसतो. बाबूजी त्या परंपरेचे वाहक होते, असे फडणवीस म्हणाले.