आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली!

By नरेश डोंगरे | Published: March 12, 2024 12:15 AM2024-03-12T00:15:30+5:302024-03-12T00:16:01+5:30

भिरभिरणारी नजर बघून आरपीएफने ताब्यात घेतले : धोक्याच्या वळणावर आलेला सोनू कुटुंबियात परतला.

The mother picked up the 200 rupees that she kept in the envelope and he stormed out of the village | आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली!

आईने पदरमोड करून ठेवलेले २०० रुपये उचलले अन् त्याने गावातून धूम ठोकली!

नागपूर : पती अर्ध्यावरच डाव मोडून कायमचा निघून गेल्यामुळे त्या बिचारीच्या सर्व आशा आकांक्षा मुलावरच केंद्रित होत्या. तो छान शिकावा. मोठा अधिकारी व्हावा, अशी तिची अपेक्षा होती. त्यासाठी ती रात्रंदिवस कबाडकष्ट करून मुलगा आणि मुलीच्या भविष्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्या अभ्यासाची काळजी घेतानाच तो दांडी मारत असल्याचे लक्षात आल्यास त्याला रागावत होती. किशोरवयात आलेला सोनू (नाव काल्पनिक, वय १४) मात्र त्यामुळे चिडत होता. त्याला आईचे रागावणे आवडत नव्हते. त्याला ती एक प्रकारची कटकट वाटत होती. त्यामुळे तो चांगलाच वैतागला होता. ८ मार्चला असेच झाले. आईने रागावल्यामुळे तो चिडला अन् आई तसेच छोट्या बहिणीपासून दूर पळून जाण्याचा त्याने निर्णय घेतला. आईने पदरमोड करून घरात ठेवलेले २०० रुपये घेतले अन् त्याने गाव सोडले. चंद्रपूर जिल्ह्यातून तो नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचला.

कुठे जायचे, काय करायचे, काहीही निश्चिंत नव्हते. रागाच्या भरात घर, गाव सोडून नागपुरात पळून आलेला सोनू रविवारी, १० मार्चला सकाळी येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर, ईटारसी पुलाजवळ थांबला. सैरभैर झालेली मनस्थिती आणि त्याची भिरभिरनारी नजर पाहून कर्तव्यावर असलेल्या आशिष कुमार नामक आरपीएफच्या जवानाने त्याच्यावर लक्ष ठेवले. तो एकटाच असल्याचे ध्यानात आल्यानंतर ते सोनूजवळ गेले. त्याला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. आई रागावल्यामुळे भांडण करून घरून पळून आल्याचे सोनूने सांगितले. सोबतच आपले नाव, गाव, पत्ताही सांगितला. आशिषने ही माहिती पीएसआय प्रियंका सिंह यांना सांगितली. प्रियंकाने वरिष्ठांना माहिती देऊन ताब्यात घेतलेल्या सोनूची वास्तपूस्त केली. त्यानंतर त्याच्या आईशी संपर्क साधून तो अल्पवयीन असल्यामुळे नातेवाईक त्याला घ्यायला नागपुरात येईपर्यंत सोनूला चाईल्ड लाईनच्या ताब्यात दिले. एकीकडे पती निराधार करून निघून गेला तर आता ज्याच्याकडे आधार म्हणून बघते, तो मुलगाही अशा प्रकारे पळून गेल्याने सोनूच्या आईची अवस्था पायाखालची जमिन सरकल्यासारखी झाली होती. मात्र, आरपीएफच्या जवानाच्या सतर्कतेमुळे या निराधार आईला तिचा लाडका काही तासांतर परत मिळाला अन् धोक्याच्या वळणावर आलेले त्याचे भवितव्यही सुरक्षित झाले. नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यापूर्वी चाईल्ड लाईनने सोनूचे समुपदेशन केले अन् त्याला भविष्यातील खाचखळग्यांचीही कल्पना दिली.

नन्हा फरिश्ता !
घरून पळून आलेल्या किंवा पळवून आणलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना शोधण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक तैनात असते. ते अशा बालकांना तब्यात घेऊन त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्याची कामगिरी बजावते. आरपीएफने त्याला 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' असे नाव दिले आहे. गेल्या वर्षभरात आरपीएफने अशा प्रकारे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत ठिकठिकाणच्या ४०० वर मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

Web Title: The mother picked up the 200 rupees that she kept in the envelope and he stormed out of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर