आईनेच गळा दाबून घेतला आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा जीव

By दयानंद पाईकराव | Published: May 21, 2024 11:28 AM2024-05-21T11:28:35+5:302024-05-21T11:28:57+5:30

एमआयडीसीतील घटना : पतीसोबत झालेल्या भांडणातून उचलले पाऊल

The mother strangled the life of her three-year-old child | आईनेच गळा दाबून घेतला आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा जीव

The mother strangled the life of her three-year-old child

नागपूर : पतीसोबत झालेल्या भांडणातून रागाच्या भरात आईनेच आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून जीव घेतला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

ट्विंकल रामा राऊत (२४, रा. एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसी असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर रियांशी रामा राऊत (३) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. आरोपी महिला ट्विंकल ही रामा लक्ष्मण राऊत (२४, रा.एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसी) याच्यासोबत २०२० पासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. दोघेही बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसीत काम करतात. त्यांना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी रियांशी नावाची चिमुकली झाली. परंतु ट्विंकल आणि रामा हे नेहमीच एकमेकांवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आपसात भांडण करायचे. सोमवारी २० मे २०२४ रोजी ट्विंकल आणि रामा दोघेही सकाळी ८ वाजता कंपनीत कामाला गेले. कंपनीतून दुपारी १२ ते ३ दरम्यान रामा बाहेर गेला. ट्विंकलला संशय आल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे रामा घरी झोपी गेला. ट्विंकल दुपारी ३.३० वाजता आपली चिमुकली रियांशीला घेऊन घराबाहेर पडली.

पत्नी आणि चिमुकली घरी दिसत नसल्यामुळे रामाने त्यांचा शोध घेतला. परंतु त्या कुठेच आढळल्या नाहीत. त्यामुळे रामा घरी परत आला. त्यानंतर एमआयडीसी पोलिस रामाच्या घरी आले. ते रामाला घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे रामाला आपली चिमुकली रियांशीचा मृत्यू झाल्याचे समजले. त्याने आपली पत्नी ट्विंकलला रियांशीच्या मृत्यूबाबत विचारना केली असता तिने आपणच रियांशीचा इलेक्ट्रिकल झोन चौक ते अमर नगर कडे जाणाऱ्या रोडवर एका झाडाखाली गळा, तोंड, नाक, छाती दाबून जीव घेतल्याचे तिने सांगितले. त्यामुळे रामा ट्विंकलला घेऊन एमआयडीसी ठाण्यात गेला असता तेथेही ट्विंकलने रियांशीचा जीव घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे रामाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, उपनिरीक्षक महेश पवार यांनी ट्विंकलविरुद्ध कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. मातेनेच आपल्या चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याची बातमी पसरताच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
 

Web Title: The mother strangled the life of her three-year-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.