कापूस व तुरीच्या शेतात असलेल्या महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 08:37 PM2023-01-16T20:37:37+5:302023-01-16T20:38:19+5:30
Nagpur News शेतातील कापूस व तुरीच्या पिकात बसली असलेल्या महिलेच्या डोक्यावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी २ वाजताच्या सुमारास जाड व धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले.
नागपूर : शेतातील कापूस व तुरीच्या पिकात बसली असलेल्या महिलेच्या डोक्यावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी २ वाजताच्या सुमारास जाड व धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. त्या महिलेचा साेमवारी (दि. १६) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी शिवारात घडली असून, तिच्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
शोभा अशाेक कराडे (३७, रा. सुरेवाणी, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. ती शुक्रवारी दुपारी ठेक्याने केलेल्या शेतातील कापूस व तुरीच्या पिकात एकटी बसली हाेती. अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यावर जाड व धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर दुखापत झाल्याने तिला नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचा साेमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी शोभाचा भाऊ जितेंद्र माणिक कोचे (३०, रा. काेटलबर्री, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) याने शनिवारी (दि. १४) पोलिसात तक्रार दाखल केल्याने खापा पाेलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाच्या गुन्ह्याची नाेंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
पती तुरुंगात
सुरेवाणी शिवारातील तलावाच्या काठी वाघाची शिकार केल्याप्रकरणी मृत शोभाचा पती अशाेक कराडे याच्यासह देवराव मडावी, ऋषी साहरे (दाेघेही रा. सुरेवाणी) आणि नितेश वागधरे (रा. चाेरखैरी, ता. सावनेर) यांना दीड महिन्यापूर्वी वन विभागाने अटक केली हाेती. हे सर्व आराेपी सध्या नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात आहेत.
संशयित पाेलिसांच्या ताब्यात
आबू ऊर्फ दिनेश उईके (२१, रा. सुरेवाणी) हा घटनेच्या वेळी शोभाच्या शेतात आला हाेता, अशी माहिती शोभाचा भाऊ जितेंद्र कोचे याने पाेलिसांना दिली हाेती. घटनास्थळी रक्त पडून असल्याचे तसेच शोभाचा मृत्यू घातपात असल्याचेही त्याने पाेलिसांना सांगितले हाेते. या प्रकरणात पाेलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, या प्रकरणात आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.