बोर्डाला अध्यक्ष नाही दिला; पण उपसंचालक बदलविला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 01:08 PM2023-06-28T13:08:22+5:302023-06-28T13:09:43+5:30
उपसंचालकाच्या बदलीवरून शिक्षण विभागात चर्चेचे काहूर : ड्यू पूर्ण होण्यापूर्वीच झाली रवानगी
नागपूर : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाला अनेक वर्षांपासून अध्यक्षाची प्रतीक्षा आहे. मंडळाचे सचिवच बोर्डाचा कारभार बघत आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने बोर्डाला अध्यक्ष दिला नाही; मात्र शिक्षण उपसंचालकांची तडकाफडकी बदली करून, अमरावती बोर्डाच्या सचिवांची नागपूरच्या उपसंचालकपदी बदली केली. डॉ. वैशाली जामदार यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे शिक्षण विभागात उलटसुलट चर्चेचा सूर उमटत आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रचंड अनागोंदी वाढली होती, असा आरोप आता शिक्षक संघटना आणि शिक्षकही करीत आहेत.
शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्या कार्यकाळात ॲण्टी करप्शन विभागाने तीन लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या कार्यकाळात कुठलेही काम आर्थिक तडजोडीशिवाय होतच नव्हते, अशीही शिक्षकांची ओरड आहे. विधान परिषदेच्या आजी-माजी आमदारांनी त्यांच्या विरोधात भरपूर तक्रारी केल्या होत्या. मंत्रालयापर्यंत त्यांच्या तक्रारी जाऊन पोहोचल्या होत्या. त्यामुळे विनंती बदलीही त्यांनी मागितली असल्याची चर्चा आहे. एकापाठोपाठ एक पडलेल्या ॲण्टी करप्शनच्या धाडीमुळे संशय आणखी दाटला होता. तेव्हा शिक्षण उपसंचालक कार्यालयातीलच एका लिपिकासह एका शिक्षकाला रंगेहाथ पकडल्यानंतर शिक्षण विभाग अलर्ट झाला होता. या घटनेनंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी उल्हास नरड यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात मायनॉरिटीच्या शाळेत मोठ्या प्रमाणात बॅक डेटमध्ये शिक्षकांना अप्रुव्हल देऊन शालार्थ आयडी देण्यात आला. त्यांच्या गैरव्यवहाराच्या, निष्काळजीपणाच्या, त्यांचे शिक्षणाधिकारी, वेतनपथक यांच्यावर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी माजी आमदारांनी केल्या होत्या. त्यांचे कार्यालय दलालांचा अड्डा होता, असेही बोलले जात आहे.
शासनाने वेळीच दखल घेतली नाही
आज त्यांना जाऊन महिना झाला आहे. आता कुठे त्यांच्या बाबतीत वेगवेगळे खुलासे पुढे येत आहेत. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आम्ही शिक्षण विभागाच्या वरच्या पातळीपर्यंत केल्या होत्या. शासनाने वेळीच दखल घेतली असती, तर फार लवकर त्यांची बदली झाली असती, असेही शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.