Nagpur | शिक्षक मतदार संघात भाजपची गोची, काँग्रेसचे मात्र 'वेट ॲण्ड वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 12:37 PM2022-10-10T12:37:05+5:302022-10-10T12:41:24+5:30
परिषदेकडून गाणार फायनल : काँग्रेसकडे संघटनांकडून पाठिंब्याची मागणी
नागपूर :नागपूरशिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी घोषित करताना भाजपची चांगलीच गोची झाली आहे. उमेदवाराच्या संदर्भात वारंवार बैठका होऊनही नाव निश्चित झालेले नाही. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागो गाणार यांची उमेदवारी घोषित केली आहे. पाठिंब्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला पत्र पाठविले आहे. भाजपच्या स्वत:च्या असलेल्या शिक्षक आघाडीचे दोन उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर काँग्रेसने अजूनही या मतदार संघात आपले पत्ते उघडलेले नाहीत, पण काही शिक्षक संघटनांच्या उमेदवारांनी काँग्रेसला पाठिंबा मागितला आहे. काँग्रेस मात्र ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.
पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने शिक्षक मतदार संघ कायम राहावा, म्हणून भाजप शिताफीने पाऊल टाकत आहे. सलग दोन टर्म भाजपने परिषदेच्या उमेदवाराला समर्थन देऊन निवडूनही आणले आहे, पण यंदा भाजपच्या स्वत:च्या शिक्षक आघाडीतून डॉ.कल्पना पांडे व अनिल शिवणकर हे पक्षाकडून अपेक्षा ठेवून आहे. परिषद आणि भाजप शिक्षक आघाडीने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी जास्तीतजास्त मतदार नोंदणीचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे भाजप परिषदेला समर्थन देते की, स्वत:च्या पक्षातील आघाडीचा उमेदवार घोषित करते हे बघणे महत्त्वाचे आहे.
गेल्या टर्ममध्ये काँग्रेसने पहिल्यांदा पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरविला होता, पण यंदा काँग्रेस स्वत:चा उमेदवार रिंगणात उतरविण्यापेक्षा मतदार संघात ज्या शिक्षक संघटनांची ताकद जास्त आहे. त्या संघटनेच्या उमेदवाराला समर्थन देऊन मतदारसंघावर आपली पकड मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. विमाशि, शिक्षकभारती, राष्ट्रवादी शिक्षक संघ हे काँग्रेसकडे समर्थनासाठी अपेक्षा ठेवून आहे, पण काँग्रेस भाजपकडून उमेदवार घोषित झाल्यानंतरच उमेदवाराच्या बाबतीत निर्णय घेणार, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
नागपूर जिल्ह्यावर सर्वांची भिस्त
मतदार संघातील एकूण मतदारांपैकी ४५ टक्के मतदार हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. विमाशिचे सुधाकर अडबाले सोडल्यास इतर सर्व इच्छुक नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नागपूर मतदारसंघात मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. शिक्षकांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. भरती रखडलेली आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या प्रश्नामुळे नवशिक्षक मतदारांना बदलही अपेक्षित आहे.