महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जागतिक प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 09:59 PM2022-04-07T21:59:01+5:302022-04-07T21:59:47+5:30
Nagpur News बुद्धगयायेथील महाबोधी महाविहाराकरिता जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले.
नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे भारतातीलच नव्हे तर जगातील बौद्धांचे आस्थेचे केंद्र आहे. परंतु, ते अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही. यासाठी देशपातळीवर बराच संघर्ष झाला. आंदोलने झाली. परंतु आता त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी येथे केले.
गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने दीक्षाभूमी येथील आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात थायलंड येथून आलेल्या पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी भिक्खू बोधिनंदा मुनी (थायलंड), गगन मलिक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, घनश्याम फुसे, भंते हर्षबोधी, भंते विनयबोधी, डॉ. भिक्षुणी सुनीती, कॅप्टन नत्तकिट (थायलंड), तक्षशीला वाघधरे, अशोक सरस्वती यांच्यासह विनोद थुल, प्रकाश कुंभे, दिनेश शेंडे, शरद अवथरे, प्रा. प्रवीण कांबळे, रेखा लोखंडे, वर्षा धारगावे, रजनी तायडे आदी उपस्थित होते.
नाना पटोले यांनी यावेळी जगाला तारण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. यानंतर दिवसभर भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम चालला. नितीन गजभिये यांनी भूमिका विशद केली. प्रास्ताविक पी.एस. खोब्रागडे यांनी केले. भीमराव फुसे यांनी आभार मानले.
थायलंडमधून भारताला ८४ हजार बुद्धमूर्तींचे वाटप
यावेळी गगन मलिक यांनी भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. भारतात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी थाायलंडकडून ८४ हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच थायलंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. तसेच बुद्धिझमबद्दल माहितीसाठी वर्ल्ड ऑफ बुद्धिस्ट डॉट कॉम हे संकेतस्थळही २० एप्रिलपासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गगन मलिक यांचा सत्कारही करण्यात आला.