बुद्धाचे तत्त्वज्ञान आचार-विचारात रुजविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 09:13 PM2022-10-03T21:13:44+5:302022-10-03T21:14:30+5:30
Nagpur News केवळ प्रतिमा उभारून चालणार नाही, तर बुद्ध तत्त्वज्ञानाची लाेकशाही मूल्ये आचार-विचारात रुजविण्याची गरज आहे, असे मत लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
नागपूरः बुद्धाचे तत्त्वज्ञान हे प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वावर उभे आहे. म्हणूनच तत्त्वप्रिय डाॅ. बाबासाहेबांना बुद्धाचे आकर्षण वाटणे स्वाभाविक हाेते. त्यामुळे भारतीय संविधानाला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लाेकशाहीची मूल्ये त्यात आहेत. त्यामुळे केवळ प्रतिमा उभारून चालणार नाही, तर बुद्ध तत्त्वज्ञानाची लाेकशाही मूल्ये आचार-विचारात रुजविण्याची गरज आहे, असे मत लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय बाैद्ध धम्म परिषदेच्या समाराेपप्रसंगी ते बाेलत हाेते. भगवान महावीर आणि तथागत बुद्ध या दाेघांनीही शाश्वत सत्याचा शाेध घेण्यासाठी राजघराण्याचा, वैभवाचा त्याग केला. भगवान महावीर यांनी दिलेले ‘क्षमा’ तत्त्व अहिंसेचा पाया आहे. महापुरुषांचे तत्त्व जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे. मात्र महापुरुषांच्या समतेचे विचार आज कुठे दिसत नाहीत. जातिभेद पुन्हा फाेफावताे आहे. जगाचेही राजकारण बदलले असून, धरती रक्ताने लाल हाेत आहे. त्यामुळे बुद्धाची कास धरल्याशिवाय पर्याय नाही, याचे भान जगाला हाेणे आवश्यक आहे, तरच माणूस व माणुसकी जिवंत राहील, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले.
समाराेपप्रसंगी संघकाया फाउंडेशनचे अध्यक्ष अजाहा प्रशील गाैतम, पुरणचंद्र मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, श्रीपाद अपराजित, माहिती आयुक्त राहुल पांडे, वेदप्रकाश मिश्रा आदी उपस्थित हाेते.