तिगांव, पांढूर्णा आणि भरतवाडा स्थानकावर नवीन एफओबी प्रवाशांची उडणारी तारांबळ थांबणार
By नरेश डोंगरे | Updated: April 10, 2025 17:01 IST2025-04-10T16:57:58+5:302025-04-10T17:01:07+5:30
Nagpur : बांधण्यात आलेले नवीन एफओबी नागपूर विभाग, मुंबई विभाग, भुसावळ विभाग, पुणे विभाग

The new FOB at Tigaon, Pandhurna and Bharatwada railway stations
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या गाडीचा फलाट बदलल्यानंतर प्रवाशांची उडणारी तारांबळ लक्षात घेऊन मध्य रेल्वेनेनागपूरसह चार विभागात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण १४ रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) बांधले आहेत. त्यात नागपूर विभागातील तिगांव, पांढुर्णा आणि भरतवाडा रेल्वे स्थानकावरील तीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)चाही समावेश आहे.
बहुतांश स्थानकावर अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे ऐनवेळी येणाऱ्या गाड्यांचा फलाट क्रमांक बदलविला जातो. आधी क्रमांक एकवर येणारी रेल्वे गाडी नंतर मात्र दुसऱ्याच फलाट क्रमांकावर येण्याची घोषणा होते. अशा वेळी प्रवाशांना रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा धोका निर्माण होऊ नये किंवा प्रवाशांची तारांबळ उडू नये, यासाठी विविध विभागातील रेल्वे स्थानकांवर एफओबी निर्माण करण्याची गरज संबंधित विभागाने विशद केली होती. तसा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गेल्या वर्षी राज्यातील १४ रेल्वे स्थानकांवर एफओबी बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तिगांव,पांढुर्णा आणि भरतवाडा रेल्वे स्थानकावर नवीन एफओबी बांधण्यात आले आहे. यामुळे नमूद स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
बांधण्यात आलेले नवीन एफओबी
- नागपूर विभाग : तिगांव, पांढुर्णा, भरतवाडा
- मुंबई विभाग : गोवंडी, खांडी, बदलापूर्, कामन रोड
- भुसावळ विभाग : अंकई
- पुणे विभाग : येवला, निंबळक, अकोलनेर, विळद, पाटस