अन् कुख्यात गुंडाने पोलीस ठाण्यात स्वत:ला पेटवून घेतले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 02:27 PM2022-04-02T14:27:23+5:302022-04-02T14:40:05+5:30
आरोपीने बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून माचिसची काडी उगाळली. ते पाहून दोन पोलीस त्याच्याकडे धावले. त्यांनी लगेच त्याला विझविले आणि तातडीने रुग्णालयात नेले.
नागपूर : जप्त केलेला मोबाइल परत देण्याचा हट्ट धरून, एका कुख्यात गुंडाने स्वत:ला पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला लगेच विझविल्याने मोठा अनर्थ टळला. गुरुवारी रात्री ८च्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली.
सोनू राजकुमार दांडेकर (वय ३२) असे या गुंडाचे नाव आहे. तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असून, त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमारीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. होळीच्या दिवशी त्याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एकाला मारहाण करून लुटले होते. यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून त्याचा मोबाइल जप्त केला. हा मोबाइल परत मिळावा, म्हणून आरोपी सोनू दांडेकर सक्करदरा ठाण्यात चकरा मारत होता, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मोबाइल देता येणार नाही, असे पोलीस त्याला सांगत होते.
गुरुवारी रात्री ७.४५ ते ८ च्या सुमारास सोनू सक्करदरा ठाण्यात आला आणि दारूच्या नशेत बरळू लागला. आताच्या आता मोबाइल पाहिजे, असे तो म्हणू लागला. नेहमीचेच गाऱ्हाणे म्हणून पोलिसांनी त्याला धाकदपट करून तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात सोनूने बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून माचिसची काडी उगाळली. ते पाहून दोन पोलीस त्याच्याकडे धावले. त्यांनी लगेच त्याला विझविले आणि तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर तो धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
पोलिसांची उडाली भंबेरी
या घटनेमुळे सक्करदरा पोलिसांनी काही वेळेसाठी चांगलीच भंबेरी उडाली होती. माहिती कळताच, वरिष्ठांनीही सक्करदऱ्यात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. ठाणेदार धनंजय पाटील यांनी सोनू दांडेकरविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
एमपीडीएचा प्रस्ताव तयार
आरोपी सोनू दांडेकरविरुद्ध १४ गुन्हे दाखल असून, दारूच्या नशेत तो कुणालाही लुटतो. त्याच्यामुळे सक्करदऱ्यातील नागरिकच नव्हे, तर त्याच्या घरची मंडळीही भयभीत आहे. पोलिसांसाठीही तो डोकेदुखीचा विषय आहे. ते लक्षात घेता, त्याच्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आठ ते दहा दिवसांत वरिष्ठांकडून तो मंजूर करून सोनूला कारागृहात डांबण्यात येणार आहे.