‘आयआयएम-नागपूर’च्या प्रवेशात विद्यार्थिनींची सहा पटींनी झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 03:48 PM2022-04-21T15:48:51+5:302022-04-21T16:24:47+5:30
‘आयआयएम-अहमदाबाद’च्या धर्तीवर ‘आयआयएम-नागपूर’ने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ही वाढ दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
योगेश पांडे
नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मधील विद्यार्थिनींच्या अत्यल्प प्रमाणावरून विविध प्रश्न उपस्थित होत होते. मात्र मागील पाच वर्षांत विद्यार्थिनींच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. २०१७-१९ या बॅचच्या तुलनेत यंदाच्या बॅचमध्ये विद्यार्थिनींची टक्केवारी सहा पटींनी वाढली आहे. ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या धर्तीवर ‘आयआयएम-नागपूर’ने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ही वाढ दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘आयआयएम-नागपूर’ स्थापन झाल्यानंतर पहिले तीन वर्ष विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. २०१७-१९ च्या तिसऱ्या बॅचमध्ये विद्यार्थिनींची टक्केवारी ३.५१ टक्के इतकीच होती. एकूण ५७ प्रवेश असताना त्यात केवळ दोनच विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर २०१९-२१ या बॅचचा अपवाद सोडला तर सातत्याने विद्यार्थिनींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. ‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र, ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचेच प्रतिबिंब प्रवेशांमध्ये उमटले. २०२१-२३ या बॅचमध्ये २४५ प्रवेश झाले आहेत. यापैकी २३.२० टक्के विद्यार्थिनी आहेत.
प्रवेशाची आकडेवारी
बॅच : विद्यार्थी : विद्यार्थिनी
२०१५-१७ : ९४.३३ % : ५.६६ %
२०१६-१८ : ८७.०४ % : १२.९६ %
२०१७-१९ : ९६.४९ % : ३.५१ %
२०१८-२०२० : ७८ % : २२ %
२०१९-२०२१ : ८४ % : १६ %
२०२०-२०२२ : ७८.५७ %- २१.४३ %
२०२१-२३ : ७६.८० % - २३.२० %
विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा १७ महिन्यांचा सरासरी अनुभव
‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी ३४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २२.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २६.४० टक्के विद्यार्थ्यांना २ वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे. तर ३१.२० टक्के विद्यार्थ्यांना दोन वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा १७ महिने इतका आहे.
सात वर्षांत साडेचार पट प्रवेशवाढ
‘आयआयएम-नागपूर’ची स्थापना होऊन सात वर्ष पूर्ण झाले असून, नवीन कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी उद्घाटन होणार आहे. सात वर्षांत ‘आयआयएम’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे दिसून आले. २०१५-१७ या पहिल्याच बॅचमध्ये केवळ ५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. सात वर्षांत प्रवेशसंख्येत साडेचार पटींहून अधिक वाढ झाली असून, २०२१-२३ या विद्यमान बॅचमध्ये प्रवेश क्षमता वाढली असून २४५ प्रवेश झाले.
प्रवेशाची आकडेवारी
बॅच - प्रवेश
२०१५-१७ : ५३
२०१६-१८ : ५४
२०१७-१९ : ५५
२०१८-२०२० : १११
२०१९-२०२१ : १२३
२०२०-२०२२ : २१०
२०२१-२०२१ : २४५