आयकरदात्यांची संख्या वाढली; मात्र नागपूर विभागात ३६५ पदे रिक्त

By मोरेश्वर मानापुरे | Published: July 30, 2024 11:41 PM2024-07-30T23:41:16+5:302024-07-30T23:41:26+5:30

माहितीच्या अधिकारात बाब उघड : कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

The number of income tax payers increased But 365 posts are vacant in Nagpur division | आयकरदात्यांची संख्या वाढली; मात्र नागपूर विभागात ३६५ पदे रिक्त

आयकरदात्यांची संख्या वाढली; मात्र नागपूर विभागात ३६५ पदे रिक्त

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : प्रधान मुख्य आयकर आयुक्त (पीसीसीआयटी) नागपूर विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ३६५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एकीकडे देशात आयकरदात्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे पुढाकार घेण्यात येत नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर कार्यालयातील दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२४ पर्यंत रिक्त पदांची संख्या ३६५ आहे. ही संख्या ३१ मार्च २०१४ पर्यंत २७६ होती. दहा वर्षांच्या कालावधीत रिक्त पदांच्या संख्येत ८९ ने वाढ झाल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जावर पीसीसीआयटी, नागपूर कार्यालयाने माहिती दिली.
कोलारकर म्हणाले, दहा वर्षांनंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. कर्मचारी मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कार्यरत असून त्यांच्या खांद्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळेच देशात आयकर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आयकर विभागात खूपच कमी कर्मचारी असल्याची माहिती आहे. याच कारणांनी आयकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण वाढला आहे. 

प्राप्त आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२४ पर्यंत आयकर नागपूर कार्यालयात १,२३४ पदे मंजूर असून त्यापैकी ८६९ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आणि ३६५ पदे रिक्त आहेत. तर ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार ९९० पदे मंजूर होती. त्यापैकी ७१५ पदांवर कर्मचारी कार्यरत होते आणि २७६ पदे रिक्त होती. सरकार देशात आयकरदात्यांची संख्या वाढविण्यावर भर देत आहे, तर दुसरीकडे करदात्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी-कमी होत आहे. ही या विभागाची शोकांतिका आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. भरती प्रक्रियेने उच्च शिक्षितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे कोलारकर यांनी सांगितले.

दिनांक मंजूर पदे कार्यरत रिक्त पदे
१ जाने.-२४ १,२३४ ८६९ ३६५
३१ मार्च-१४ ९९० ७१५ २७६

Web Title: The number of income tax payers increased But 365 posts are vacant in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर