नोटरी मिळतात फूटपाथवर, प्रतिष्ठाच टांगली वेशीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 11:10 AM2022-02-22T11:10:33+5:302022-02-22T11:13:24+5:30
किमान दहा वर्षे वकिलीचा अनुभव आणि निष्कलंक असलेल्या वकिलांची नोटरी म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु, काही नोटरींनी आपले कर्तव्य प्रतिष्ठापूर्वक व कायदेशीरपणे पूर्ण करण्याचे सोडून स्वत:सह कायदेशीर व्यवसायाचा दर्जाही मातीमोल केला आहे.
राकेश घानोडे
नागपूर : उपराजधानीत रोडसाईड नोटरींचा सुळसुळाट वाढला आहे. शेकडो नोटरी रोडच्या बाजूला फूटपाथवर जागा मिळेल तेथे दस्तावेज प्रमाणिकरणाची कामे करीत आहेत. त्यांच्यामुळे कायदेशीर व्यवसायाच्या प्रतिष्ठेला वेशीवर टांगून ऐशीतैसी केली जात आहे. या प्रकाराबाबत काही ज्येष्ठ वकिलांनी नाराजी व्यक्त करून दस्तावेज प्रमाणिकरण व इतर कामे अशाप्रकारे रस्त्यावर बसून करता येणार नाहीत, असा नियम लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने रोडसाईड नोटरींवर प्रहार करून हा प्रकार थांबविण्यासाठी नियम लागू करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यामुळे हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला आहे. कायद्यानुसार नोटरी नियुक्त करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारला आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन किमान दहा वर्षे वकिलीचा अनुभव आणि निष्कलंक असलेल्या वकिलांची नोटरी म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु, काही नोटरींनी आपले कर्तव्य प्रतिष्ठापूर्वक व कायदेशीरपणे पूर्ण करण्याचे सोडून स्वत:सह कायदेशीर व्यवसायाचा दर्जाही मातीमोल केला आहे. नोटरीचे स्वत:चे कार्यालय असावे किंवा त्यांनी चार भिंतीच्या आत राहूनच कर्तव्य बजावावे, अशी तरतूद कायद्यात नाही. याचा अर्थ नोटरींनी रोडच्या बाजूला जागा मिळेल तेथे दस्तावेज प्रमाणिकरणाची कामे करावीत असा हाेत नाही, असे बोलले जात आहे.
सन्मान जपून व्यवसाय करावा
रोडसाईड नोटरी कायदेशीर व्यवसायासाठी अशोभनीय आहेत. त्यांनी स्वत:सह कायदेशीर व्यवसायाचा सन्मान जपूनच कर्तव्य बजावले पाहिजे. याशिवाय नोटरींनी कधीच दस्तावेजांचे बेकायदेशीर प्रमाणिकरण करू नये.
ॲड. रणजित सारडे, अध्यक्ष, महाराष्ट्र नोटरी संघटना.
सरकारने नियम आणावा
नोटरींना रोडच्या बाजूला बस्तान मांडून दस्तावेज प्रमाणिकरण व इतर कामे करता येणार नाही, असा नियम लागू करणे आवश्यक आहे. कायदेशीर व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. रोडसाईड नोटरींमुळे हा आदर नष्ट होत आहे.
ॲड. शशिभूषण वाहाणे, ज्येष्ठ विधिज्ञ.
ही कामे करतात नोटरी
१ - कायदेशीर दस्तावेजांची पडताळणी व प्रमाणिकरण
२ - एखाद्या व्यक्तीला शपथ देणे किंवा त्याच्याकडून शपथपत्र घेणे
३ - एखाद्या दस्तावेजातील मजकुराचे भाषांतर करणे व भाषांतर प्रमाणित करणे
४ - न्यायालयात साक्षीदाराचे बयाण नोंदविण्यासाठी आयुक्त म्हणून कर्तव्य बजावणे.
५ - लवाद, मध्यस्थ व समुपदेशक म्हणून कार्य करणे, आदी.