चिंचभुवनचा जुना ओव्हरब्रीज तोडणार; सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 02:36 PM2023-08-22T14:36:20+5:302023-08-22T14:37:11+5:30
मध्य रेल्वेतर्फे थर्ड, फोर्थ लाईनचे काम
वसीम कुरेशी
नागपूर : नागपूर-वर्धा हायवेवर चिंचभुन येथील जुना ओव्हरब्रीज खापरीकडील भागातून तोडण्यात येत आहे. यामुळे सोमवारी सायंकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाच्या खापरीकडील भागात काँक्रीट बॉक्स टाकण्यात येणार असून, त्या कामासाठी तीन महिन्यांचा वेळ लागणार आहे.
शहरात वर्धा मार्गावर मागील दोन वर्षांपासून डायव्हर्शनची समस्या सुरू आहे. आता खापरीकडील भागात उतरणारा चिंचभुवन रोड ओव्हरब्रीज तोडण्यात येत असल्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड आणि फोर्थ लाईनच्या कामामुळे जुन्या पुलाच्या खालील रुंदी वाढविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे या पुलाला लागून असलेला पूल या रेल्वे लाईनच्या कामामुळे तयार करण्यात आला होता. जुन्या पुलाच्या कामाचे कंत्राट सीएस कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. कंपनीने सोमवारी सायंकाळी जुन्या पुलाच्या लोखंडी पॅनलच्या फेन्सिंगने रस्ता बंद करून वळविला आहे.
हिवाळ्यात थर्ड, फोर्थ लाईनवरून धावू शकतात रेल्वे
नागपूर ते सेवाग्राम ६९ किलोमीटर लांबीच्या थर्ड आणि चौथ्या लाईनचे काम करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधी ते खापरी ३४ किलोमीटरची लाईन टाकण्यात आली आहे. याशिवाय खापरी ते अजनीपर्यंत सात किलोमीटरमध्ये तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर सेवाग्राम ते सिंधीपर्यंत अतिरिक्त लाईनचे काम होणार आहे. हे काम २०१६-१७ पासून सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे नागपूर-सेवाग्राम सेक्शनमध्ये सेक्शनची क्षमता २०० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. ही क्षमता १०० टक्के होण्यासाठी येथे थर्ड लाईन गरजेची होती. सेक्शनची क्षमता दुप्पट होण्यासाठी चौथ्या लाईनची गरज होती.