रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समुळे संरक्षण क्षेत्रालादेखील फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 12:41 PM2022-02-21T12:41:54+5:302022-02-21T12:45:37+5:30

तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २९ जून रोजी विदर्भ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली होती.

The petrochemical complex, including the refinery, also benefits the defense sector | रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समुळे संरक्षण क्षेत्रालादेखील फायदा

रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समुळे संरक्षण क्षेत्रालादेखील फायदा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासंदर्भात अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. प्रत्यक्षात हे पेट्रोलियम कॉम्प्लेक्स रिफायनरीसह व्हावे असा अनेकांचा आग्रह आहे. यामुळे उद्योग जगतालाच नव्हे तर अगदी संरक्षण क्षेत्रालादेखील फायदा होईल, असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २९ जून रोजी विदर्भ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेला आठ महिने होऊनही आजवर टेक्नो फिजिबिलिटी (व्यावहारिकता) तपासण्यासाठी एजन्सी नियुक्त झालेली नाही. या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो व याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आले तर त्याचा फायदा संरक्षण क्षेत्रालादेखील होऊ शकतो. संरक्षण मंत्रालयासाठी स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह ऑफ पेट्रोलियम तयार करण्यासाठी विदर्भातील हा प्रकल्प हे सर्वात योग्य ठिकाण ठरेल. गुजरात आणि पंजाब या राज्यांत चक्रीवादळ व शत्रूंच्या क्षेपणास्त्रांचा धोका असतो. विदर्भात ते जास्त सुरक्षित राहतील. याशिवाय विदर्भातून सर्व मोड्सद्वारे सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी असल्याने सर्व सीमांवर उत्पादनांचा जलद पुरवठादेखील होऊ शकेल, असा दावा वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी केला आहे.

विदर्भातील आयटीआयसाठी संधी विस्तारतील

या प्रकल्पामुळे प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होतील. बांधकामाच्या सुरुवातीपासून ते प्रकल्प सुरू करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामे शिकण्यास मिळतील. मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांना निधी दिला जाऊ शकतो. यामुळे अकुशल ते कुशल संक्रमण दुप्पट होण्यास मोठी मदत होईल. शिवाय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही या तरुणांना जगातील सर्वोत्तम संधी मिळू शकतात, असे माहेश्वरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: The petrochemical complex, including the refinery, also benefits the defense sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.