ठरलं! प्रस्तावित पेट्रोलियम कॉम्प्लेक्स बुटीबोरीतच; ५५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 12:51 PM2023-04-08T12:51:35+5:302023-04-08T12:55:21+5:30
लवकरच होणार करार
कमल शर्मा
नागपूर : विदर्भात प्रस्ताविक पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससाठी आवश्यक असलेल्या जागेचा शोध अखेर पूर्ण झाला आहे. बुटीबोरी येथील एमआयडीसीची जागा या प्रकल्पासाठी ‘बेस्ट’ ठरली आहे. वीज, पाणी आणि समृद्धी महामार्गाजवळ असल्याने बुटीबोरीला प्राधान्य मिळाले आहे. बुटीबोरीसोबतच कुही आणि चंद्रपूर जिल्हाही या स्पर्धेत सहभागी होते.
पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससाठी नियुक्त नोडल एजन्सी एमआयडीसीच्या विनंतीवर केंद्र सरकारची कंपनी इंजिनिअर्स इंडिया लि.ने काही दिवसांपूर्वी बुटीबोरी येथील ठरावीक जागेचा सर्व्हे केला होता. पेट्रोलियम तज्ज्ञ विनायक मराठे यांनी सर्व्हेमध्ये बुटीबोरीला उपयुक्त असल्याचे सांगितले. आता ‘टर्म ऑफ रेफरेन्स’ निश्चित करून सविस्तर ‘फिजिबिलिटी रिपोर्ट’ (व्यवहार्यता अहवाल) तयार करण्याचा करार केला जाईल. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)चे अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी सांगितले की, हा प्रकल्प एकूण ५५ हजार कोटींचा राहण्याची शक्यता आहे. एमआयडीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये व्यवहार्यता अहवालासाठी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. इंजिनिअर्स इंडिया लि.चे कोटेशन येताच करार केला जाईल. ३१ ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल येण्याची शक्यता आहे.
प्राथमिक सर्व्हेमध्ये रामा डॅममधून पाणीपुरवठा व ट्रीटमेंट प्लांटचाही आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. समृद्धी महामार्ग जवळच आहे. रेल्वे नेटवर्क व वीज पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे बुटीबोरीला प्राधान्य मिळाले.
२९ जून २०२१ ला झाली होती घोषणा
तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २९ जून २०२१ रोजी विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापित करण्याची घोषणा करीत तांत्रिक व्यवहार्यता रिपोर्ट तयार करण्याचे निर्देश दिले होते. २२ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी चंद्रपुरात असे जाहीर केले होते की, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित ६० एमटीपीए क्षमतेच्या रिफायनरीसह पेट्रोकेमिकल रिफायनरीला २० एमटीपीएच्या तीन रिफायनरीमध्ये विभाजित करून त्यातील एक रिफायनरी विदर्भात स्थापित करण्याचा विचार केला जात आहे. जानेवारीमध्ये तांत्रिक व्यवहार्यता रिपोर्ट तयार करण्यासाठी एमआयडीसीला नोडल एजन्सी बनवण्यात आले.
गॅस आधारित असावा प्रकल्प
पेट्रोलियम कॉम्प्लेक्सचे तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, नागपुरातील प्रकल्प हा गॅस आधारित असावा. मुंबईवरून नागपूरपर्यंत नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गेल (गॅस ऑथरिटी ऑफ इंडिया) च्या सहकार्याने हे काम होऊ शकते. असाच एक प्रकल्प उत्तर प्रदेशातील ओरैया येथे यशस्वीपणे सुरू आहे.