खेळाडूंनी रेशीमबाग मैदानासाठी एनआयटी कार्यालयात केले आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Published: December 27, 2023 02:28 PM2023-12-27T14:28:16+5:302023-12-27T14:28:32+5:30
मैदान नाही खेळायला, अन् सरकार म्हणते खेलो इंडिया खेलो
नागपूर - रेशीमबाग मैदानातून अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत हे मैदान धार्मिक आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी वापरले जात आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमित सराव करणे शक्य होत नाही. त्याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर होत असल्याने रेशीमबाग मैदान खेळासाठीच हवे, या मागणीसाठी ४०० ते ५०० खेळाडूंनी एनआयटीच्या कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून जोडे काढो आंदोलन केले.
रेशीमबाग मैदान हे नागपूर शहराच्या मध्य भागात असल्याने शहरातील खेळाडू व पोलिस प्रशिक्षणार्थी सकाळ ते संध्याकाळ येथे सराव करतात. या मैदानाचा हजारो गोरगरीब युवकांना पोलिस, सैन्यदलात व इतर शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळण्याकरिता महत्त्वाचा वाटा आहे. मागील अनेक वर्षांपासून या मैदानाचा वापर मनोरंजक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमांसाठी सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी व खेळाडू विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामुळे अडथळा निर्माण होतो आहे. हे मैदान सीपी अँड बेरार कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल यांना लीजवर देण्यात आलेले आहे. पण ज्या कारणास्तव हे मैदान लीजवर देण्यात आले आहे, त्या कारणाच्या विपरीत उपयोग या मैदानाचा होत आहे.
खेळाडू विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे मैदान फक्त खेळाडू, पोलिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी मागणी खेळाडूंनी केली. माजी नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने खेळाडूंनी एनआयटीच्या कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. खेळाडूंनी कार्यालयापुढे खेळाचे प्रात्यक्षिक केले. शेवटी जोडे काढून मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी देत असल्यामुळे निषेध केला.