'‘कीर्ती" चाचणीसाठी पहाटेच गाठले खेळाडूंनी मैदान - निवड चाचणीच्या प्रक्रियेस प्रारंभ
By आनंद डेकाटे | Published: April 24, 2024 05:07 PM2024-04-24T17:07:26+5:302024-04-24T17:10:14+5:30
Nagpur : क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडू निवड चाचणीस प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘कीर्ती' उपक्रमातंर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खेळाडू निवड चाचणीस प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या रविनगरातील क्रीडांगणावर खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून आयोजित असलेल्या निवड चाचणीसाठी पहाटे पासूनच खेळाडूंनी मैदान गाठले. पहिल्याच दिवशी विविध भागातील तब्बल ३५० खेळाडूंनी अॅथलेटिक्सच्या निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला.
खेलो इंडिया व्हिजनला पुढे नेण्यासाठी टॅलेंट अँटिफिकेशन आणि डेव्हलपमेंटचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या अंतर्गत आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय बेंच मार्क वापरून क्रीडा प्रतिभा ओळखणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हा उद्देश कीर्तीचा आहे. या उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कीर्ती उपक्रम अंतर्गत ५ क्रीडा प्रकाराची मान्यता मिळाली आहे.
कोणत्याही जिल्ह्यातील ९ ते १८ वयोगटातील मुले व मुली या निवडचाचणीत सहभागी होऊ शकतात. पहिल्याच दिवशी अॅथलेटिक्स खेळ प्रकारातील रनिंग, थ्रोईंग व जम्पिंगची चाचणी खेळाडूंनी दिली. सुरुवातीला फिजिकल फिटनेस चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ६० मी. स्प्रिंग, बॉल थ्रो, शॉर्टपूट (स्टँडिंग), ६०० मी. धावणे, लांब उडी व उंच उडी आदी प्रकारासाठी मुले व मुलींची निवड चाचणी घेण्यात आली. अॅथलेटिक्स खेळ प्रकारात नागपूरसह, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा आदी परिसरातील खेळाडू सहभागी झाले होते. कबड्डी (मुले-मुली) या खेळ प्रकाराकरीता बुधवारी निवड चाचणी पार पडली. यापूर्वी खेळाडूंची फुटवर्क, हॅन्ड टच, टो टच, कॅचिंग अबलिटी आदी विविध चाचण्या देखील करण्यात आल्या.