साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 08:51 PM2023-04-25T20:51:24+5:302023-04-25T20:51:55+5:30

Nagpur News यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

The prices of tur and dal fell due to the stock limit | साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

googlenewsNext


नागपूर : देशात मागील काही वर्षांपासून तूर डाळीचा वापर वाढला. सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून या डाळीकडे पाहिले जाते. यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.


गेल्यावर्षी तूर डाळीचे दर दर्जानुसार ८५ ते ९८ रुपये किलो होते. यंदा दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे. आता भाव १०९ ते १२४ रुपये असून आठवड्यापूर्वी भाव ११३ ते १२९ रुपये किलो होते. दरवाढीला कृत्रिम टंचाईचा गंध आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या आदेशानंतर प्रत्येक राज्य सरकारने डाळींचा काळाबाजार थांबविण्यासाठी आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


तूरीवर आयात शुल्क शून्य!
मोदी सरकारने संपूर्ण तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लागू केले होते. आता हे शुल्क पूर्णपणे समाप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचे आदेश ३ मार्च २०२३ रोजी दिले. हे आदेश ४ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यामुळे डाळीचे दर १५० रुपयांपर्यंत वाढण्याचे व्यापाऱ्यांचे संकेत फोल ठरले आहेत. शून्य आयात शुल्कामुळे तूर डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण आणि भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.


उत्पादन कमी; आयातही कमीच
नागपुरात २५० पेक्षा जास्त दालमील असून उत्पादनासाठी तूरीची आवश्यकता असते. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नसल्यामुळे काही मील बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नागपूर, लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतही तुरीची आवक खूपच कमी आहे. कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, सध्या तूरीचे दर दर्जानुसार ७७ ते ८४ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून भाव ३ ते ४ रुपयांनी कमी झाले. आवक कमीच आहे. दररोज १६०० ते १८०० क्विंटल तूर येत आहे. गेल्यावर्षी याच काळात दररोज ४ हजार क्विंटलहून अधिक आवक होती.

Web Title: The prices of tur and dal fell due to the stock limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न