पंतप्रधानांनी ढोल वाजवला अन् अमितचा आनंद गगनात मावेना! सांगितला पंतप्रधानांसोबतचा अनुभव...
By प्रविण खापरे | Published: December 11, 2022 05:31 PM2022-12-11T17:31:24+5:302022-12-11T17:34:30+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाद्य, यांचे एक अनोखे नाते आहे. देशभरात असो वा परदेशात, जिथे कुठे ते जातात आणि स्थानिक कलावंत वाद्यजंत्री वाजवताना दिसले की थांबतात, जवळून न्याहाळतात आणि वाद्ययंत्रावर हातही अजमावतात.
नागपूर :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाद्य, यांचे एक अनोखे नाते आहे. देशभरात असो वा परदेशात, जिथे कुठे ते जातात आणि स्थानिक कलावंत वाद्यजंत्री वाजवताना दिसले की थांबतात, जवळून न्याहाळतात आणि वाद्ययंत्रावर हातही अजमावतात. रविवारी नागपुरातही त्यांना वाद्य वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (एम्स)च्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राचे परंपरागत वाद्य ढोल-ताशा मनसोक्त बडवला आणि ज्याचा ढोल बडवला, त्या अमित भेदेला एका क्षणात जगप्रसिद्ध करून सोडले. या क्षणाने अमित इतका गदगद झाला की त्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिहान परिसरातील एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा रंगला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे-कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. पंतप्रधानांचे स्वागत गजवक्र ध्वज पथकाद्वारे महाराष्ट्राचे परंपरागत वाद्य ढोल ताशाने करण्यात आले. संगीतप्रेमी नरेंद्र मोदी यांनी थेट पथकात शिरून वाद्य आणि वादकांच्या वादनाचे निरीक्षण केले आणि तेथेच असलेल्या अमित भेदे यांच्याशी हितगूज करत ‘ये लकडी मुझे दोगे क्या’ असा सवाल केला.
अमितने तात्काळ ‘सर, ये लकडी नही टिपरू है’ असे उत्तर देत टिपरू मोदींच्या हातात दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिपराने, तर अमितने हाताच्या थापेने लयबद्ध ढोल बडवला. यावेळी मोदी स्वत:ही तालबद्ध संगीत संयोजनात विलीन झाल्याचे भासत होते. त्यानंतर त्यांनी प्रत्येक वादकांशी संवाद साधत प्रोत्साहन दिले. इतर मान्यवरांनीही वादकांचे कौतुक केले. या घटनेने मात्र अमित भेदे जगप्रसिद्ध झाला आणि त्याचे नातेवाईक, मित्र मंडळी साऱ्यांनीच त्यांचा हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. शहरातील अनेक राजकीय नेते मंडळींनीही अमितशी संवाद साधत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अमितला हे वर्ष लाभले लकी
- अमित भेदे हा २३ वर्षांचा असून त्याने याच वर्षी गणेशोत्सवात गजवक्र ध्वज पथकात वादन शिकण्याच्या हेतूने प्रवेश घेतला आणि त्यांच्या पहिल्याच वादनात त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतीने वादन करण्याची संधी लाभल्याचे पथकाचे प्रमुख प्रतीक चंबोळे यांनी सांगितले. हे वर्ष माझ्यासाठी लकी लाभल्याची भावना अमितने व्यक्त केली आहे.