संपूर्ण समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान २ मे रोजी करणार लोकार्पण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:21 IST2025-04-19T12:20:02+5:302025-04-19T12:21:09+5:30
Nagpur : काम पूर्ण झाल्यामुळे वाहन चालक नागपूर ते ठाणे हे अंतर केवळ ७ते ८ तासांत आणि मुंबई आणखी काही तासात गाठणे शक्य होणार

The Prime Minister will inaugurate the entire Samruddhi Highway on May 2nd!
लोकमत न्यूज नेटववर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ७०१ किलोमीटर लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण २ मे रोजी होऊ शकते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. नागपूर ते इगतपुरीपर्यंतच्या ६२५ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर वाहतूक सुरू होऊन त्याच्या ७६ किलोमीटरच्या अंतिम टप्प्यात म्हणजे इगतपुरी-अमाने (ठाण्याजवळ) पर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यामुळे वाहन चालक नागपूर ते ठाणे हे अंतर केवळ ७ते ८ तासांत आणि मुंबई आणखी काही तासात गाठणे शक्य होणार आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा तयार करणे खूप कठीण होते. महामार्गाचा हा टप्पा सह्याद्री पवर्तरांगेतून जातो. ७६ किलोमीटरमधून ११ किलोमीटरचा हा रस्ता भुयारी आहे. यातील सर्वात लांब भुयार ८ किलोमीटरची आहे. इगतपुरीजवळ हा भुयारी रस्ता जगातील सर्वात लांब आणि रुंद भुयारी रस्त्यांपैकी एक आहे. याशिवाय या महामार्गाचा जवळपास ११ किलोमीटर रस्ता एलिव्हेटेड आहे. यामुळे वाहनचालकांना कसारा घाटाच्या वळणदार रस्त्यावरून प्रवास करावा लागणार नसून ते पुलावरून प्रवास करू शकतील.
अंतिम टप्प्याबाबत माहिती
इगतपुरी-अमानेपर्यंतचे अंतर : ७६ किलोमीटर
भुयारी रस्त्याची एकूण लांबी : ११ किलोमीटर
इगतपुरी भुयाराची लांबी : ८ किलोमीटर (खूप लांब)
व्हाया डक्टची लांबी : ११ किलोमीटर
सर्वांत लांब व्हायाडक्ट) २.३ किलोमीटर
सर्वांत उंच व्हायाडक्ट पिल्लर : ८४ मीटर (२० मजली इमारतीसारखा)
सध्या नाशिक ते ठाणे जाण्यास लागणारा वेळ : ३.५ तास
समृद्धी महामार्गाने अंदाजे प्रवासाचा कालावधी : १ तास
समृद्धीमार्गाचे लोकार्पण
नागपूर-शिर्डी : ५२० किलोमीटर : डिसेंबर २०२२
शिर्डी-भरवीर : ८० किलोमीटर : मे २०२३
भरवीर-इगतपुरी :) २५ किलोमीटर : मार्च २०२४
इगतपुरी-अमाने : ७६ किलोमीटर : मे २०२५ (अंदाजे)