अमृत भारत स्टेशन योजना : पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी ५०० रेल्वेस्थानकांच्या नुतनीकरणाचा शिलान्यास

By नरेश डोंगरे | Published: August 3, 2023 09:16 PM2023-08-03T21:16:11+5:302023-08-03T21:16:21+5:30

नागपूर विभागातील १५ स्थानकांचा समावेश : ३७२ कोटींचा खर्च, रेल्वेस्थानकांचे केले जाणार साैंदर्यीकरण

The Prime Minister will laid the foundation stone of renovation of 500 railway stations on Sunday | अमृत भारत स्टेशन योजना : पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी ५०० रेल्वेस्थानकांच्या नुतनीकरणाचा शिलान्यास

अमृत भारत स्टेशन योजना : पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी ५०० रेल्वेस्थानकांच्या नुतनीकरणाचा शिलान्यास

googlenewsNext

नागपूर : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील ५०० रेल्वेस्थानकांच्या नुतनीकरणाचा शिलान्यास रविवारी, ६ ऑगस्ट २०२३ ला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेनुसार नागपूर विभागातील १५ रेल्वेस्थानाकांचे साैंदर्यीकरण करून त्यांचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे. नागपूर विभागातील घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नारदेव, मुलताई, पांढूर्णा, नरखेड, काटोल, गोधनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश आहे. त्यासाठी ३७२.७ कोटी रुपये खर्च केला जाणार असून १५० कोटी रुपये खर्चून प्रत्येक स्थानकावर १२ मिटर रुंद फूट ओव्हर ब्रीज बनविले जाणार आहे.

उर्वरित खर्चातून रेल्वे स्थानकांच्या आकर्षक प्रवेश द्वारासह बाह्य साैंदर्यीकरण, पार्किंग, एप्रोच रोड आतमध्ये प्रवाशांना फलाटावर प्रशस्त जागा आणि वेटिंग हॉल, लिफ्ट, एस्केलेटर, इलेक्ट्रॉनिक कोच इंडिकेशन बोर्ड, स्वच्छता गृह आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही पांडे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशूतोष श्रीवास्तव तसेच जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत पगारे, अमोल गहूकर, समन्वयक राजेश चिखले उपस्थित होते.

गोधनीला भव्य कार्यक्रम
या योजनेत समावेश करण्यात आलेल्या नागपूर विभागातील प्रत्येकच रेल्वे स्थानकांवर ६ ऑगस्टला कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, प्रत्येक स्थानकांवर कोणती कामे अत्यावश्यक आहे, ते जाणून घेण्यासाठी त्या-त्या भागातील मंत्री खासदार, आमदारासह, महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, सरपंच तसेच सर्वच लोकप्रतिनिधींना, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाला बोलविण्यात आले आहे. त्यांच्याकडून कोणती विकासकामे केली जावी, या संबंधानेही सूचना मागविण्यात येणार आहे. प्रत्येकाला हे स्टेशन आपले आहे, अशी भावना व्हावी आणि त्यातून चांगल्यात चांगले विकास कामे करता यावी, यासाठी आम्ही या योजनेत लोकसहभाग वाढविण्यावर भर देत असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी सांगितले.

गोधनी स्थानकावर शिलान्यासाचा कार्यक्रम

नागपूर जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांपैकी मुख्य कार्यक्रम गोधनी रेल्वे स्थानकावर होणार आहे. त्यासाठी येथील मंत्री तसेच अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क सुरू आहे. शुक्रवारपर्यंत त्यांच्या उपस्थितीची स्थिती स्पष्ट होणार आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर किती खर्च

  • स्थानक : खर्च
  • घोडाडोंगरी : १८.८८ कोटी रुपये
  • बैतूल : २४.८६ कोटी रुपये
  • आमला : ३१.६९ कोटी रुपये
  • जुन्नारदेव : २४.२० कोटी रुपये
  • मुलताई : १७.४९ कोटी रुपये
  • पांढूर्णा : १६.६७ कोटी रुपये
  • नरखेड : ४०.८१ कोटी रुपये
  • काटोल : २५.३५ कोटी रुपये
  • गोधनी : २८.९४ कोटी रुपये
  • सेवाग्राम : १९.३६ कोटी रुपये
  • पुलगाव : १७.९१ कोटी रुपये
  • धामनगांव : १९.२८ कोटी रुपये
  • हिंगणघाट : २३.७२ कोटी रुपये
  • चंद्रपूर : २७.६६ कोटी रुपये
  • बल्लारशाह : ३४.०३ कोटी रुपये
  • परासिया : १.२०कोटी रुपये

Web Title: The Prime Minister will laid the foundation stone of renovation of 500 railway stations on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.