पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे दर्शन, वंदनातून आद्य सरसंघचालक प्रणाम, नागपुरातील संघ शिक्षा वर्ग, बैठकींच्या जागविल्या आठवणी

By योगेश पांडे | Updated: March 31, 2025 06:09 IST2025-03-31T06:06:12+5:302025-03-31T06:09:19+5:30

Narendra Modi In RSS Headquarters: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे चारहून अधिक नागपूर दौरे झाले. मात्र ते एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किंवा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात न गेल्याने स्वयंसेवकांच्या भुवयादेखील दरवेळी उंचावल्या जात होत्या. मात्र रविवारी संघ प्रणालीत महत्त्वाचा उत्सव असलेल्या वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावरच पंतप्रधान स्मृतिमंदिरात पोहोचले.

The Prime Minister's visit to the Swayamsevak, the first Sarsanghchalak's greetings, the Sangh Shiksha class in Nagpur, and the memories of the meetings were awakened. | पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे दर्शन, वंदनातून आद्य सरसंघचालक प्रणाम, नागपुरातील संघ शिक्षा वर्ग, बैठकींच्या जागविल्या आठवणी

पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे दर्शन, वंदनातून आद्य सरसंघचालक प्रणाम, नागपुरातील संघ शिक्षा वर्ग, बैठकींच्या जागविल्या आठवणी

- योगेश पांडे
नागपूर -  पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे चारहून अधिक नागपूर दौरे झाले. मात्र ते एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किंवा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात न गेल्याने स्वयंसेवकांच्या भुवयादेखील दरवेळी उंचावल्या जात होत्या. मात्र रविवारी संघ प्रणालीत महत्त्वाचा उत्सव असलेल्या वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावरच पंतप्रधान स्मृतिमंदिरात पोहोचले. विशेष म्हणजे नागपूर दौऱ्यात जागोजागी पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे सार्वजनिक पद्धतीने दर्शन झाले. सोबतच इतर स्वयंसेवकांप्रमाणे आद्य सरसंघचालकांच्या जयंतीच्या दिवशीच अभिवादन करत आपल्या पद्धतीने आद्य सरसंघचालक प्रणामदेखील केला. यावेळी त्यांच्या संघजीवनातील वर्ग व बैठकांच्या आठवणीदेखील जागविल्या. या तिहेरी योगामुळे संघ वर्तुळात उत्साहाचे वातावरण होते.

सकाळी डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचल्यावर पंतप्रधान हे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच इतर मान्यवरांसोबत अगोदर डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधिस्थळी दर्शनाला गेले. एरवी समाधिस्थळाचे दर्शन घेताना मान्यवर मंडळी एकदा नतमस्तक होतात. मात्र मोदी काही काळ तेथे स्तब्ध झाले आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधिस्थळासमोर दोनदा नतमस्तक झाले.

पायी फिरून घेतले दर्शन
गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृतिमंदिर परिसरात आले होते. त्यानंतरच्या काळात परिसराचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले. मोदींनी त्याची माहिती सरसंघचालकांकडून जाणून घेतली. समाधिस्थळावरून ते परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहाकडे वाहनाऐवजी प्रोटोकॉल बाजूला सारून सरसंघचालकांसोबत पायीच निघाले. यावेळी संघ शिक्षा वर्ग व बैठकांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मोदींच्या चेहऱ्यावरूनदेखील ते स्पष्टपणे जाणवत होते.

संघ पदाधिकाऱ्यांसोबत ‘शॉर्ट’ चर्चा
दर्शनानंतर पंतप्रधानांनी महर्षी व्यास सभागृहाचे निरीक्षण केले. या सभागृहात संघाच्या सर्व मोठ्या बैठकी होतात. यानंतर दत्तोपंत ठेंगडी सभागृहात संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना माजी सरकार्यवाह व संघाच्या कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तेथे सहसरकार्यवाह अतुल लिमये, मुकुंदा जी., संघ पदाधिकारी सुरेश सोनी, प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग हेदेखील उपस्थित होते. तेथेदेखील एखाद्या स्वयंसेवकाप्रमाणेच पंतप्रधानांचे वर्तन होते आणि अगदी सहजतेने ते २० हून अधिक पदाधिकाऱ्यांमध्ये मनमोकळेपणाने मिसळले.

काय आहे आद्य सरसंघचालक प्रणाम
संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा वर्ष प्रतिपदेच्या दिवशीच जन्म झाला होता. या दिवसाचे संघ प्रणालीत मोठे महत्त्व असून सहा प्रमुख उत्सवांपैकी हा उत्सव आहे. केवळ याच दिवशी स्वयंसेवक आद्य सरसंघचालक प्रणामाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार यांना वंदन करतात. पंतप्रधानांनी दौऱ्यासाठी हा मुहूर्त साधला व त्यांच्या समाधिस्थळी नमन केले. संवैधानिक पदावर व अधिकृत दौऱ्यावर असल्याने त्यांनी प्रत्यक्ष स्वयंसेवकाप्रमाणे संघ प्रणाम न करता नमस्कार तसेच वंदन केले. संघाच्या परिभाषेत दायित्व निभावत असताना त्यांनी त्यांच्या कर्तव्याचेदेखील पालन करत स्वयंसेवकांना त्यांच्या कृतीतून नेमका संदेश दिला.

Web Title: The Prime Minister's visit to the Swayamsevak, the first Sarsanghchalak's greetings, the Sangh Shiksha class in Nagpur, and the memories of the meetings were awakened.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.