मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले
By मंगेश व्यवहारे | Published: December 13, 2023 10:29 AM2023-12-13T10:29:42+5:302023-12-13T10:30:05+5:30
मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून प्रत्यक्षात काही करायचे नाही, असा आरोप नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
नागपूर : मराठा आरक्षणावरून या सरकारने रस्त्यावरचे भांडण चव्हाट्यावर आणले आहे. मंत्रालयात बसून ओबीसी आणि मराठ्या नेत्यांना सोबत घेत हा प्रश्न सोडवला असता. परंतु सरकारला हे करायचे नव्हते. मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून प्रत्यक्षात काही करायचे नाही, असा आरोप नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसे सुरतला गेले होते तसे आम्हीही सुरतला गेलो होतो. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सुरतला लुटलेला खजिना परत आणण्यासाठी गेले होते. परंतु हे गुलामगिरीसाठी गेले. त्यांना कस्टडीत ठेवण्यात आले होते. त्यातला एका नेत्याला हलताना डोलताना लोकांनी बघितले.