डाळी कडाडल्या; तूर डाळ १६५ रुपये किलो, ताटातून वरण गायब
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 30, 2023 04:02 PM2023-08-30T16:02:14+5:302023-08-30T16:03:57+5:30
स्टॉकिस्टांवर धाडी टाकण्याची मागणी, होऊ शकते निर्यात बंदी
नागपूर : भाजीपाला आणि इंधन दरवाढीने गृहिणींचे किचनचे बजेट बिघडलेले असून त्यात डाळींची भर पडली आहे. ऑगस्टमध्ये सर्वच डाळींच्या किमती कडाडल्या आहेत.
श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे. दरवाढीमुळे खिशाला भुर्दंड बसत असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने मोठ्या कंपन्यांवर धाडी टाकून स्टॉक बाहेर आणावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
दोन महिन्यात तूर डाळ २५ रुपयांची महाग
डाळींचे नवीन पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येणार आहे. तोपर्यंत स्वयंपाकघरात महाग डाळींचाच उपयोग करावा लागणार आहे. वरण असो वा अन्य पदार्थांमध्ये डाळींचा उपयोग होतो. पण आता महागड्या डाळींमुळे ताटातून वरण गायब झाले आहे. गेल्या दोन महिन्यात तूर डाळ २५, उडीद मोगर २० रुपये, मूग मोगर ३०, हरभरा डाळ २५ आणि मसूर डाळ ६ रुपयांनी महाग झाली आहे. सद्यस्थितीत डाळीचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यंदा प्रारंभी मुसळधार पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळींवर निर्यात बंदी केली तरच दर कमी होतील, असे मत कळमना येथील होलसेल धान्य विक्रेते रमेश उमाटे यांनी व्यक्त केले. डाळींचे खरेदीदार ५० टक्के असल्याचे उमाटे यांनी सांगितले.
डाळवर्गीय पिकांकडे वळला शेतकरी
केंद्र सकरारने हमीभाव वाढविल्याने शेतकरी डाळवर्गीय पीक लागवडीकडे वळला आहे. यंदा डाळी प्रचंड महाग होतील, एवढेही पीक कमी आलेले नाही. त्यानंतरही तूर आणि अन्य डाळींचे भाव का वाढत आहेत, हे एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्याचे पीक घेतले जाते. राजस्थान व मध्य प्रदेशातून डाळींचा पुरवठा होतो. त्यानंतरही डाळी महागच आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचे रमेश उमाटे यांनी सांगितले.
कंपन्यांकडे जास्त साठा, धाडी टाकाव्यात
मोठ्या कंपन्यांकडे लाखो टन साठा असल्याचा ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. सरकार मोठ्या कंपन्यांवर कारवाई करत नाही. त्याचा भुर्दंड सामान्यांवर बसत आहे. दर अचानक वाढल्याने ग्राहकांना डाळींसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. दर आवाक्यात आणण्यासाठी सरकारने तालुका आणि जिल्हास्तरावरील स्टॉकिस्टवर धाडी टाकाव्यात. अनेक दालमील मालकांनी भूमिगत टाक्यात तूरीचा साठा केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त माल आहे. अतोनात नफा कमविण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सामान्य पिचला जात आहे. सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक दालमीलची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गजानन पांडे यांनी केले आहे.
डाळी दोन महिन्यांपूर्वीचे भाव आताचे भाव (प्रतिकिलो)
तूर १२८-१४० १५०-१६५
हरभरा ५३-५५ ७२-८०
मसूर ७५-८० ८२-८६
उडीद मोगर ९०-१२० १०८-१४०
मूग मोगर ९०-९५ १०८-१२४