परीक्षा वेळेवर न झाल्याने भडकले रेल्वे कर्मचारी; अजनीत उमेदवारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 10:30 PM2023-04-20T22:30:06+5:302023-04-20T22:31:27+5:30
Nagpur News नागपूर मंडळातील सर्व संबंधित कर्मचारी उमेदवार अजनी येथील सेंट एंथोनी शाळेच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु बराच वेळ होऊनही परीक्षा सुरू झाली नाही. दुसरीकडे ऊन वाढू लागल्याने उमेदवारही संतापले आणि त्यांनी गोंधळ घातला.
नागपूर : मध्य रेल्वे नागपूर मंडळातील कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी मंडळस्तरीय परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यासाठी नागपूर मंडळातील सर्व संबंधित कर्मचारी उमेदवार अजनी येथील सेंट एंथोनी शाळेच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु बराच वेळ होऊनही परीक्षा सुरू झाली नाही. दुसरीकडे ऊन वाढू लागल्याने उमेदवारही संतापले आणि त्यांनी गोंधळ घातला. अखेर अधिकाऱ्यांनी ही परीक्षा अनिश्चितकाळासाठी स्थगित केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या इंजिनिअरिंग विभागातील कनिष्ठ अभियंता (रेल पथ) पदासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता सेंट एंथोनी स्कूल अजनी येथे परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यासाठी नागपूर मंडळातील दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी उमेदवार अजनीत पोहोचले होते. परंतु १२:१५ वाजूनही परीक्षा सुरू झाली नाही. परीक्षेबाबत विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे कर्मचारी उमेदवार संतापले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. परीक्षेची तयारी अपुरी असल्याने अधिकाऱ्यांनी सुद्धा परीक्षा स्थगित केली. त्यानंतर सर्व उमेदवार परत गेले.
काही उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार बराच वेळ होऊनही पेपर न आल्याने परीक्षा सुरू झाली नाही. १२:३० नंतर अधिकारी पेपर घेऊन आले आणि त्यांनी उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी समजावणे सुरू केले. परंतु उमेदवारांनी मात्र त्यांना ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची विनंती केली. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत अजनीत तणावपूर्ण वातावरण होते.
सेंट्रल रेल्वे मजूर संघाचे मंडळ अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी या घटनेची माहिती गुरुवारी झालेल्या पीएनएम मीटिंगमध्ये मंडळ रेल्वे व्यवस्थापक तुषार कांत पांडेय यांना दिली. दरम्यान, डीपीओ यांनी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली.