परतीचा पाऊस पुन्हा दाेन दिवस मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 08:56 PM2022-10-20T20:56:49+5:302022-10-20T20:57:13+5:30
Nagpur News आजपासून परतीचा पाऊस महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याची शक्यता अपेक्षित असताना त्याचा मुक्काम अजून दाेन दिवस वाढण्याची स्थिती आहे.
नागपूर : आजपासून परतीचा पाऊस महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याची शक्यता अपेक्षित असताना त्याचा मुक्काम अजून दाेन दिवस वाढण्याची स्थिती आहे. मात्र, जाेरदार पावसाची स्थिती पूर्णपणे मावळली आहे. विदर्भ आणि खान्देश वगळता राज्यात तुरळक ठिकाणी अगदीच किरकाेळ पावसाची शक्यता जाणवत आहे. दिवाळी मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात जाईल, असा अंदाज आहे.
२० ऑक्टाेबरपासून मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे निघून जाण्याची अपेक्षा हाेती. मात्र, वातावरणाची स्थिती बदलल्याने दाेन दिवस मुक्काम लांबल्याचे सांगितले जात आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या दापोली समोर ते लक्षद्वीपच्या पश्चिम किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने सध्या इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. मुक्काम लांबला असला तरी जाेरदार पावसाची शक्यता अजिबात नाही. २१ राेजी तुरळक ठिकाणी हलका पाऊस हाेण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र तिही शक्यता आता राहिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. २२ ऑक्टाेबरपासून मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाशसह उघाड राहिल. दिवाळीत पाऊस हाेण्याचा अंदाज हाेता पण आता ती शक्यताही मावळली असून पाऊसमुक्त दिवाळी हाेईल, अशी अपेक्षा आहे. मुंबई व काेकणात तुरळक ठिकाणी २३ ऑक्टाेबरला पावसाची शक्यता जाणवते.
बंगालच्या उपसागरात निर्माण हाेत असलेल्या चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशच्या नेल्लाेर येथे किणारपट्टीवर प्रभाव दिसण्याची शक्यताही कमी झाली आहे. हे चक्रीवादळ २६ ऑक्टाेबरला ओरिसाच्या किनारपट्टीला बगल देऊन पश्चिम बंगाल व बांगलादेशकडे निघून जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नागपूरसह संपूर्ण विदर्भात दाेन दिवसांपासून पाऊस झाला नाही. बुधवारी काहीसे ढगाळ वातावरण असले तरी पावसाने हजेरी लावली नाही. गुरुवारी संपूर्ण आकाश निरभ्र हाेते. आर्द्रता ६५ ते ७५ पर्यंत खाली आली आहे. काही ठिकाणी तापमान वाढ तर काही ठिकाणी पारा घसरला आहे. रात्री थंड वारे वाहत असल्याने थंडीची चाहूल लागल्याचा अंदाज आहे.