उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी
By निशांत वानखेडे | Updated: April 3, 2025 19:06 IST2025-04-03T19:05:29+5:302025-04-03T19:06:51+5:30
तापमानात ९ अंशाची विक्रमी घसरण : ३४.८ अंशावरून थेट २६.६ अंशावर

The rainy season has entered the summer! Unseasonal showers have been falling since morning.
नागपूर : गुरुवारी नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दाेन दिवसांपासून काळ्याभाेर ढगांनी आकाशाचा ताबा घेतला आहे आणि सकाळपासून राहून राहून सरीवर सरी बरसत आहेत. ढगाळ वातावरण व पावसामुळे २४ तासात कमाल तापमानात ९ ते १० अंशाची विक्रमी घसरण झाली असून चार दिवसांपूर्वी ४० अंशावर असलेले तापमान २५ ते २६ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लाेकांना पावसाळ्याचा फिल येत आहे.
नागपूर जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून आकाश ढगांनी व्यापले आहे. दाेन दिवस ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत आहेत. गुरुवारी मात्र ढगांचा रंग बदलला. सकाळपासून काळेभाेर झालेल्या आकाशाहून थांबून थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. या अवकाळीच्या पावसाने दुपारनंतरच उसंत घेतली. पावसाळी वातावरणामुळे तापमान माेठ्या फरकाने खाली घसरले. नागपूरचा पारा ३४.८ वरून ९.२ अंशाने खाली घसरत २६.६ अंशावर पडला. रात्रीचा पारा २१.६ अंशावर असून दिवसरात्रीच्या तापमानात केवळ ५ अंशाचा फरक राहिला आहे. दिवसाचा पारा सरासरीपेक्षा १२.८ अंशाने खाली घसरला आहे. तीन दिवसात १४ अंशाची घसरण झाली आहे. तसा गुरुवारी दिवसभरात ५ मि.मी. पावसाचीही नाेंद झाली.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाळी वातावरणामुळे तापमान घसरले असून उन्हाचा तडाखा गायब झाला आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक १०.६ अंशाची घसरण हाेत पारा २५ अंशावर पाेहचला आहे. गाेंदियात ९.२ अंशाची घसरण हाेत तापमान २७.५ अंश नाेंदविण्यात आले. वर्धा येथे ६ अंशाने घसरत २९ अंशावर पाेहचले. चंद्रपूर ३५.४ अंश व गडचिराेली ३५.८ अंशासह पारा घसरला आहे. अकाेला येथे मात्र पारा ६ अंशाने चढत ३७.१ अंशावर गेला आहे. विदर्भात सर्वत्र पारा सरासरीपेक्षा माेठ्या फरकाने खाली आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुन्हा २४ तास पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असून त्यानंतरचे चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहून तापमान नियंत्रणात राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळेल.