थायलंडचे ‘रामाकेईन’ हे भारतीय ‘रामायन’चं; शेषशयन देशमुख यांची माहिती
By निशांत वानखेडे | Published: January 29, 2024 09:47 PM2024-01-29T21:47:57+5:302024-01-29T21:48:06+5:30
राजवाड्याच्या दाेन किमी भिंतीवर काेरली आहे रामकथा
नागपूर : पूर्वीचा ‘सियाम’ म्हणजेच आताचे थायलंड हे रामपूजक हाेते व त्या देशातील अनेक अवशेषांवरून याचे पुरावे मिळतात. संपूर्ण बाैद्ध असलेल्या तेथील राजवंशाला ‘राम’ राजेशाही म्हणून ओळखले जाते. थायलंडचे सध्याचे राजे ‘किंग महावजिरालाेंग काॅन’ हे ‘रामा-१०’ म्हणून ओळखले जात असून व तेथील ‘रामाकेईन’ हा ग्रंथ म्हणजे भारतीय रामायण हाेय, अशी माहिती विदर्भ संशाेधन मंडळाचे संयाेजक, पुरातत्व व इतिहास अभ्यासक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी दिली.
विदर्भ संशाेधन मंडळातर्फे हाेणाऱ्या मासिक संगाेष्ठीमध्ये ‘थाई के राम’ विषयावर डाॅ. देशमुख यांनी प्रकाश टाकला. थायलंडची राजधानी बॅंकाकमध्ये किंग महावजिरालाेंग काॅन यांचा राजवाडा आहे. त्यांच्या विस्तीर्ण अशा राजमहालाच्या २ किलाेमीटर पाेर्चवर संपूर्ण रामकथा काेरली आहे. वास्तविक म्हणजे पूर्वी अयाेथ्या ही सियामची राजधानी हाेती. १७ व्या शतकात म्यानमार व थायलंडमध्ये युद्ध व्हायचे. १७६२ मध्ये एका युद्धात म्यानमारने अयाेथ्या राजधानी उध्वस्त केली. त्यामुळे तेथील राजधानी बॅंकाकला हलविण्यात आली. युद्धात ‘रामकेईन’ हा ग्रंथसुद्धा नष्ट झाला हाेता. हा वारसा संरक्षित रहावा म्हणून राजवाड्याच्या पाेर्चच्या भिंतीवर संपूर्ण रामकथा असलेले चित्र काढले. १६ फूट उंच व २ किमी लांब या भिंतीवर १७८ चित्रांमधून राम जन्मापासून ते राम-रावण युद्धापर्यंतचे प्रसंग काढले आहेत. हे भित्तीचित्र २०० वर्ष जुने आहे. १९३९ मध्ये सियामचे नाव बदलून थायलंड असे करण्यात आले. किंग वजिरालाेंग काॅन यांचे वडील ‘रामा-९’ यांचे २०१६ साली निधन झाले व वजिरालाेंग काॅन यांचा २०१९ साली राज्याभिषेक करण्यात आला.
थायलंड हा देश बाैद्ध आहे. तेथील चक्री राजवंशाचे राजा चुलालाेक उर्फ ‘रामा-१’ यांनी एम्राॅल्ड म्हणजे पाचूच्या खड्यापासून माेठे बुद्ध विहार बांधले, जे सर्वात माेठे विहार मानले जाते. बॅंकाकमध्येच दुसऱ्या एका विहारात साडेपाच टन साेन्याची बुद्ध मूर्ती जगप्रसिद्ध आहे व कडेकाेट बंदाेबस्तात आहे. असे असले तरी तेथील लाेक सर्व धर्मीयांचा आदर करतात व रामाप्रमाणेच विष्णू, हरिहर व नारायण यांच्याही अनेक मूर्ती संरक्षित केल्या आहेत.
रामकेईनचा संस्कृत अनुवाद
भारतातील संस्कृत पंडित सत्यमूर्ती शास्त्री यांनी ‘रामकेईन’ या ग्रंथाचा संस्कृतमध्ये अनुवाद केला असून त्या ग्रंथाला ‘रामकीर्ती’ या नावाने ओळखले जाते.
भारतात संवर्धनाबाबत उदासीनता
डाॅ. देशमुख यांनी सांगितले, मुंबईचे अंबरनाथ मंदिर १००० वर्षे जुने आहे. हे मंदिर एएसआयद्वारे संरक्षित असूनही तेथील अनेक मूर्ती खंडित हाेत आहेत. एका दृश्यातील ‘लिंगाेत्भव’ रुपातील शिवाच्या मूर्तीमधील विष्णूची मूर्तीच गायब झाली. भारतात वारसा संवर्धनाबाबत उदासीनता असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘इंटरनॅशनल असाेसिएशन फाॅर हिस्टरी ऑफ रिलिजन’ या संघटनेत जगभरातील सदस्य आहेत पण एकही भारतीय नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.