संसर्गाचा वेग वाढीस; मेयो, मेडिकलमधील २४५ डॉक्टर, परिचारिका कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 07:59 PM2022-01-22T19:59:13+5:302022-01-22T19:59:49+5:30
Nagpur News सध्याच्या स्थितीत मेयोतील १०३, तर मेडिकलमधील १४२ असे एकूण २४५ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीबाधित आहेत. मनुष्यबळाची अडचण सोडविण्याचे आवाहन या दोन्ही रुग्णालयांसमोर उभे ठाकले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य सेवकांना कोरोनाची वेगाने लागण होत असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. सध्याच्या स्थितीत मेयोतील १०३, तर मेडिकलमधील १४२ असे एकूण २४५ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीबाधित आहेत. मनुष्यबळाची अडचण सोडविण्याचे आवाहन या दोन्ही रुग्णालयांसमोर उभे ठाकले आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्गाची लागण अनेक डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांना झाली होती. परंतु सध्याच्या या कोरोनाचा विषाणूची संसर्गक्षमता अधिक आहे. यामुळे मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवा देणाऱ्या मनुष्यबळावर मोठा प्रभाव पडला आहे. कोरोनाची लक्षणे तीव्र स्वरुपाची नसली, तरी झपाट्याने लागण होत असल्याने कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांवर कामाचा ताण पडला आहे.
मेयोतील १०३ आरोग्य सेवक बाधित
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १०३ आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली. यात ११ वरिष्ठ डॉक्टर, ३४ निवासी डॉक्टर, ५ कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर (सीएमओ), २३ परिचारिका, १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य होम क्वारंटाईन किंवा रुग्णालयातील विलगीकरणाच्या कक्षात आहेत.
-मेडिकलमधील १४२ आरोग्य सेवकांना लागण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) जवळपास १४२ आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात विविध विभागातील १६ वरिष्ठ डॉक्टर, ५२ निवासी डॉक्टर, ५० परिचारिका व २४ विद्यार्थी आहेत. रोज साधारण ८ ते १० आरोग्य सेवक पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी दिली.
-स्त्री रोग व बधिरीकरण विभागातील सर्वाधिक डॉक्टर पॉझिटिव्ह
मेडिकलमधील स्त्री रोग व प्रसूती विभाग व बधिरीकरण विभागातील सर्वाधिक निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आले आहे. मागील १० दिवसांत बधिरीकरण विभागातील १४, तर स्त्री रोग व प्रसूती विभागातील १३ निवासी डॉक्टरांना तर, ‘ओटी’ व ‘पीटी’ विभागातील २४ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली.
-कोरोना रुग्णांच्या सेवेतील ५ टक्केच आरोग्य सेवकबाधित
मेयोमधील कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमधील केवळ ५ टक्केच लोकांना कोरोनाची लागण झाली, तर ९५ टक्के लागण ही जनरल वॉर्डात काम करणाऱ्यांना झाली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डबल मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
-डॉ. सागर पांडे, वैद्यकीय उपअधीक्षक, मेयो