देशाचा खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक - सरकार्यवाह होसबळे
By योगेश पांडे | Published: October 2, 2023 05:35 PM2023-10-02T17:35:35+5:302023-10-02T17:35:56+5:30
अगोदर देशात देशहिताबाबत बोलणे म्हणजे जणू अपराध होता - होसबळे
नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील अनेक जण वसाहतवादी मानसिकतेत होते. त्यामुळेच काही वर्षांअगोदरपर्यंत देशातच देशहिताबाबत बोलणे म्हणजे जणू अपराध होता. मात्र आता बौद्धिक स्वातंत्र्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. देशाची स्थिती बदलत असून खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. शैक्षिक फाऊंडेशन व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे आयोजित शिक्षाभूषण या शिक्षक सन्मान सोहळ्यादरम्यान ते सोमवारी बोलत होते.
रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित कार्यक्रमाला ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन येथील स्वामी चिदानंद सरस्वती महाराज अ.भा.रा.शैक्षिक महासंघाचे महामंत्री शिवानंद सिन्दनकेरा, सचिव डॉ.मनोज सिन्हा, विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ.कल्पना पांडे, सचिव डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ.मिनाक्षी जैन, डॉ.कुलदीप चंद अग्निहोत्री व डॉ.संजीवनी केळकर यांना सन्मानित करण्यात आले.
काही वर्षांअगोदर भारतातील अनेक लोक वसाहतवादी मानसिकतेतच होते. त्यामुळेच राष्ट्रीय मुद्द्यांवर संशोधन, पीएचडी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागायचा. अगदी अयोध्येवर पीएचडी करणाऱ्यांनादेखील नकार मिळायचा. मात्र आता स्थिती बदलते आहे. शिक्षकांनी नवीन पिढी घडविण्यासोबत राष्ट्रनिर्माणावर भर दिला पाहिजे. शिक्षकांना जर रस्त्यांवर आंदोलनासाठी उतरावे लागले तर ते समाजाचेच दुर्भाग्य ठरते, असे होसबळे म्हणाले. डॉ.कल्पना पांडे यांनी संचालन केले.
विरोधकांसमोर झुकण्याची गरज नाही
जेव्हा अंधकार दूर होतो तेव्हा सकारात्मक प्रकाशाला सामोरे जाण्याची इच्छा नसलेल्या विरोधी शक्ती जाणुनबुजून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र समाजातील घटकांनी अशा तत्वांना घाबरण्याची किंवा त्यांच्यासमोर झुकण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन सरकार्यवाहांनी केले.
महात्मा गांधी ते महात्मा मोदी
यावेळी स्वामी चिदानंत सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महात्मा मोदी असा उल्लेख केला. देशातील संस्कारांमुळेच महात्मा गांधी ते महात्मा मोदी अशी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व पहायला मिळाली. आज देशात संस्कारी सरकार आहे. सनातन धर्मावर काही लोक टीका करतात. मात्र सनातन धर्म हा आजार नसून उपचार आहे व समस्या नसून त्यातून शाश्वत समाधन लाभते, असे ते म्हणाले.
राममंदिराबाबत पुस्तक लिहीले म्हणून नाकारले गेले
यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ.मिनाक्षी जैन यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मी ज्या विचारसरणीच्या लोकांच्या मार्गदर्शनात अभ्यास केला तो परीक्षेचाच काळ होता. मी संशोधन करून अयोध्येतील राममंदिराबाबत ऐतिहासिक दाखले व पुराव्यांसह पुस्तक लिहीले. मात्र त्या काळी इतकी धास्ती होती की चार प्रकाशकांनी तर पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला. देशातील खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक इतिहासकारांनादेखील असाच अनुभव आला, असे त्यांनी सांगितले.