रामटेकच्या पराभवाचे खरे व्हिलन बावनकुळेच, महायुतीत वादाची ठिणगी
By योगेश पांडे | Published: June 7, 2024 06:48 PM2024-06-07T18:48:04+5:302024-06-07T18:48:33+5:30
माजी खासदार कृपाल तुमानेंचा आरोप : अमित शहा यांच्याकडून दबाव आणला
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या पदरी मोठी निराशा लागल्यानंतर आता वादाची ठिणगी पडली आहे. रामटेकच्या जागेवरून शिंदेसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अट्टहास करून माझे तिकीट कापले. त्यांच्या हट्टापोटी केवळ रामटेकची जागाच गेली नाही तर माझे राजकीय करिअरदेखील उद्ध्वस्त झाले. या पराभवाचे तेच खरे व्हिलन आहेत, असा आरोप माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपने तुमाने यांनी महायुतीत भांडणे लावू नये अशी भूमिका मांडली आहे.
तुमाने यांनी प्रसारमाध्यमांजवळ आपली भावना व्यक्त केली. मी दोनदा रामटेकचे प्रतिनिधित्व केले. दोन्ही वेळेला लाखाहून अधिक मतांनी निवडून आलो असतो. भाजपने कुठला सर्व्हे केला याची कल्पना नाही. मात्र बावनकुळे यांनी विचार करायला हवा की तिकीट कापून किती मोठी चूक केली. त्यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर मला आनंद झाला असता. मात्र कॉंग्रेसच्या व्यक्तीला आणून तिकीट देणे कोड्यात टाकणारी गोष्ट आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पराभवाची पूर्ण जबाबदारी बावनकुळे यांची होती व रामटेकच्या जागेसाठी तर तेच व्हिलन आहेत. ते मुख्यमंत्र्यांवर दररोज दबाव आणायचे. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दबाव आणून त्यांनी माझे तिकीट कापले, असा आरोप त्यांनी लावला.
गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार
मी अमित शहा यांना भेटून त्यांना तिकीट का कापली याची विचारणा करणार व बावनकुळे यांची तक्रार करणार असल्याचेदेखील तुमाने यांनी सांगितले. ज्यांच्या विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी होणार शकणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असे बावनकुळे म्हणाले होते. आता त्यांच्यात विधानसभेत महायुतीचा उमेदवार मोठ्या पिछाडीवर होता. आता बावनकुळे स्वतःपासून कारवाई करणार का असा सवाल त्यांनी केला.
सर्वांनी राजीनामे देऊन घरी बसावे का ?
तुमाने यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो. तुमाने यांना रामटेकमधून दोनदा खासदार करण्यात भाजपने मौलिक भूमिका पार पाडली होती. त्यांना उमेदवारी देणे किंवा न देणे हा शिंदेसेनेचा प्रश्न होता. आम्ही तर ती जागा भाजपसाठी मागितली होती. मात्र ती जागा शिंदेसेनेकडे गेली होती. अरविंद गजभिये, सुधीर पारवे यांना शिंदेसेनेच्या तिकीटावर लढवावे असा प्रस्तावदेखील आम्ही दिला होता. राजू पारवे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली होती. तुमाने यांनी यावेळेस असे बोलणे बरोबर नाही. एनडीएचे सरकार स्थापन होत असताना अशा आरोपांमुळे राजकीय वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तुमाने यांनी विनाकारण टीका करू नये, अशी भाजपचे डॉ.राजीव पोतदार यांनी भूमिका मांडली. एखाद्या विधानसभेत महायुतीला मते मिळाली नाही तर काय सर्वांनीच राजीनामे देऊन घरी बसावे का असा सवाल पोतदार यांनी केला.