वाळू तस्करांचा निर्ढावलेपणा; 'ब्रेक के बाद' पुन्हा काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 09:45 PM2023-04-24T21:45:53+5:302023-04-24T21:46:38+5:30
Nagpur News वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : लोकमतच्या वृत्ताने हादरलेल्या वाळू तस्करांनी दोन दिवस ब्रेक घेतला. मात्र, वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील वाळू तस्करांची भाईगिरी सर्वत्र कुपरिचित आहे. अनेक बड्या गुन्हेगारांची आणि महसूल तसेच पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींची साथ असल्याने जिल्ह्यातील वाळू माफिया नागपूर शहर आणि जिल्ह्यात वाळू तसेच गाैण आणि खनिजांची बिनबोभाट तस्करी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा गोरखधंदा करतात. यात कुणी प्रामाणिक अधिकारी आडवा आला तर त्याला आधी पैशाचे प्रलोभन दाखवले जाते. नंतर कुणाचे दडपण आणले जाते आणि त्यालाही जुमानत नसेल तर धाक दाखविला जातो. त्याला बदनाम करण्याचीही मजल मारली जाते. वाळू माफियांनी अनेकांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही प्रकार नागपूर जिल्ह्यात घडले आहेत. सरकारचा कर बुडवून वर्षाला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या वाळू माफियांना गुंड आणि महसूल तसेच पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींची साथ असल्याने त्यांचे फारसे काही बिघडत नाही. जिल्ह्यातील रेती घाट सध्या बंद आहे. त्यामुळे वाळू माफिया मध्य प्रदेशातील विविध घाटांवरून चोरीची रेती नागपूर शहर आणि जिल्ह्यात आणतात आणि विकतात. कळमना जवळच्या भरतवाडा, पारडी भागातील विण्या उर्फ विनोद भुऱ्या नामक वाळू माफिया आणि त्याचे साथीदार चक्क स्वत:च्या घराजवळ आणि आजूबाजूच्या परिसरातील रिकाम्या जागेत रेतीचा अवैध साठा करून विकतात. लोकमतने या संबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर वाळू तस्कर हादरले. त्यांनी दोन दिवस तस्करी बंद केली. मात्र, कारवाईचे अधिकार असणारांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. उलट त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे की काय तस्करांनी पुन्हा नव्या दमाने वाळू तस्करी सुरू केली आहे. यासंबंधीचा कळमन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात वाळू तस्करांची वाहने दिवसाढवळ्या साठविलेल्या ढिगाऱ्यातील रेती भरून नेत असल्याचे दिसून येते.
तीन दिवसांत १० हजारांची वाढ
वाळू माफिया चोरीच्या रेतीची तस्करी करतानाच मनमानी दराने विक्री करतात. तीन दिवसांपूर्वी वाळूचा ट्रक टिप्पर ४० ते ५० हजार रुपयांत विकत मिळत होता. आता हाच ट्रक वाळू माफिया विनोद आणि त्याच्या साथीदारांनी ५० ते ६० हजार रुपयांत विकण्याचा सपाटा लावला आहे. वाळू तस्करीत साथ देणाऱ्या महसूल आणि पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींनी हे दर वाढवून दिल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.
सरकारच्या नव्या धोरणाची प्रतीक्षा
वाळू माफिया सरकारचा दररोज लाखो रुपयांचा महसूल चोरतात. दुसरीकडे सर्वसामान्यांना दामदुप्पट दराने चोरीच्या रेतीची विक्री करतात. सरकारला फटका अन् सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या वाळू माफियांना महसूल आणि पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळींचीही साथ असल्याचे लक्षात आल्याने राज्य सरकारने वाळू तस्करांना चाप घालण्यासाठी नवे धोरण आखले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----